लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पालिकेच्या ८७६ घरकुलांच्या वाटपाची अद्यापही प्रतीक्षा लागून आहे. घरकुलांचे काम जवळपास पूर्ण झाले असून पालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या आतच त्यांचे वाटप होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पालिकेने लाभार्र्थींची यादी निश्चित करताना काही निकष ठरविले आहेत. नंदुरबारातील बेघर लोकांना घरकुले उपलब्ध करून देण्यासाठी दीड हजार घरकुलांचा प्रस्ताव पालिकेने पाठविला होता. त्यापैकी ११७६ घरकुले बांधकाम प्रस्तावित होते. प्रत्यक्षात ८७६ घरकुलांना मंजुरी मिळून त्यासाठी अनुदान दाखल झाले होते. घरकुलांच्या बांधकामासाठी जिल्हा प्रशासनाने नंदुरबारातील जिल्हा रुग्णालयासमोरील जागा तसेच धुळे रस्त्यावरील भोणे फाट्यानजीकची जागा दिली होती. त्या ठिकाणी चार मजली इमारतीत घरकुलांचे बांधकाम करण्यात आले. परंतु मध्यंतरी अर्थात दीड वर्षापूर्वी बेघर संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली अनेकांनी या घरांचा ताबा घेतला होता. त्यामुळे पालिकेला मोठी कसरत करावी लागली होती. पालिकेतर्फे यापूर्वी शहरातील फोटोपासधारक झोपडपट्टीवासीयांना घरकुलांसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यासाठी तीन ते चार वेळा मुदतवाढही देण्यात आली. परंतु फारसा प्रतिसाद मिळाला नाही. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाºया कुटुंबाचे घर ज्या भागात असेल ती जागा पालिकेच्या ताब्यात द्यावी लागणार होती. शिवाय लाभार्थी हिस्सा म्हणून १० ते १२ हजार रुपयेदेखील भरावे लागणार होते. त्यामुळे या योजनेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला होता.घरकुलांचा ताबादीड वर्षापूर्वी जवळपास ८०० जणांनी या घरकुलांचा ताबा घेतला होता. बेघर संघर्ष समितीने आपल्या यादीनुसारच लाभार्र्थींची निवड करावी, अशी मागणी केली होती. परंतु पालिकेने काही नियम व अटी लक्षात घेऊन लाभार्थी निवड करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आपल्याला घरकूल मिळणार नाही असा समज करून अनेकांनी या घरकुलांचा ताबा घेतला होता. त्या ठिकाणी अनेक कुटुंबे जवळपास वर्षभर राहिली होती. पालिकेने पोलीस बळाचा वापर करूनही संबंधित कुटुंबे घरातून बाहेर निघाली नव्हती. अखेर जिल्हाधिकाºयांनी मध्यस्थी करीत आणि पालिकेने पात्र लाभार्र्थींनाच घरकुले दिली जातील असे जाहीर केल्यानंतर संबंधित कुटुंबे घरातून बाहेर निघाली आणि ताबा सोडला.काम पूर्णजवळपास एक वर्ष अनेक कुटुंबांनी या घरकुलांचा ताबा घेतलेला होता. त्यामुळे अपूर्ण कामे पूर्ण करता येत नव्हती. अखेर ताबा सोडल्यानंतर ठेकेदाराने तातडीने उर्वरित कामे पूर्ण केली. त्यात नळ फिटिंग, किचन, लाईट फिटिंग, रंगकाम आणि इतर कामांचा समावेश होता. ते आता पूर्ण करण्यात आले असून लवकरच ठेकेदार ही घरकुले पालिकेच्या ताब्यात देणार असल्याचे सांगण्यात आले.
प्रधानमंत्री आवास योजना...केंद्र सरकारने आता बेघरांसाठी नवीन योजना आणली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घटकातील बेघरांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यात दारिद्र्यरेषेखालील, अल्प उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गटातील ज्यांच्या नावावर घर नाही अशा लोकांना या योजनेंतर्गत घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेतर्फे सर्व्हे करण्यात येणार आहे. त्यानुसार पालिका संबंधितांकडून अर्ज व आवश्यक कागदपत्रे घेऊन पात्र लाभार्र्थींची यादी शासनाला कळविणार आहे. त्यानंतर शासनाकडून संबंधित बँकांना आर्थिक निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्या त्या बँकेकडून लाभार्थी निश्चित होऊन निधी उपलब्ध करून दिला जाईल.