नगावबारी : दारूच्या नशेत एकाचे कृत्य, पोलिसांनी घेतले ताब्यात
धुळे : लग्न सोहळ्यात आलेल्या एका पाहुण्याने आनंदाच्या भरात चांगलीच दारू रिचवली. मात्र, दारूची झिंग चढल्यानंतर सहकार्यांसोबत झालेल्या वादात त्याने चक्क नवरदेवाची 'कट्यार' हाती घेऊन दहशत निर्माण केली. शेवटी देवपूर पोलिसांनी या महाभागास ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या दारूची नशा उतरली.नगावबारी परिसरात गुरुवारी एक लग्न सोहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी आलेल्या एका पाहुण्याने सहकार्यांसोबत मनसोक्त मद्यप्राशन केले. मात्र, त्यानंतर भलताच प्रकार घडला. दारूच्या नशेत तर्र् झालेल्या या पाहुण्याची सहकार्यांसोबत वादावादी झाली. त्यात ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. संतापलेला पाहुणा तर नवरदेवाची कट्यार हातात घेऊन सहकार्यांच्या मागे धावत सुटला. नगावबारी चौफुलीवर असलेल्या उड्डानपुलापर्यंत या पाहुण्याने सहकार्यांचा पाठलाग केला. मात्र, ते निसटल्याने त्याचा संताप अनावर झाला. त्याने हातातील कट्यार येणार्या-जाणार्या वाहनचालकांच्या अंगावर मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराबाबत दूरध्वनीवरून काहींनी देवपूर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. तेथे पोलिसी खाक्या दाखवताच त्या पाहुण्याची दारू उतरली. मात्र, रात्रीउशिरापर्यंत या प्रकाराबाबत देवपूर पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आली नव्हती. भीतीचे वातावरण... कट्यार हातात घेऊन शिवीगाळ करत नगावबारी उड्डाण पुलाजवळ आलेल्या या पाहुण्याचा रूद्रावतार पाहून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक वाहनधारकांना या महाभागाने अडवले. मात्र तो दारूच्या नशेत असल्याने वाहनधारकांनी त्याकडे दुर्लक्ष करत तेथून पुढे जाणे पसंत केले. या घटनेची एकच चर्चा होत होती.