कृषी विभागाने 1 जूननंतर बागायती कापूस लागवड करण्याची शिफारस केली आहे. मात्र, एक तारखेनंतर कर्ले एजीचा विद्युत पुरवठा हा रात्री पाळीचा होणार आहे. रात्री वीजपुरवठा खंडित झाला तर कोणीच दखल घेत नाही. रात्रभर खंडित असतो यामुळे येथील शेतकऱ्यांनी २५ मेपासून दिवस पाळीतच कापूस लागवडीस पसंती दिली आहे. मात्र, दिवसादेखील लाईट व्यवस्थित चालत नसल्याने वीजपुरवठा तासनतास खंडित असतो. कंपनीने पावसाळ्यापूर्वी सर्व पोल टू पोल पेट्रोलिंग करून एकदाचा चोर फाॅल्ट शोधून अखंडित वीजपुरवठा करावा आणि कायमस्वरूपी समस्या मार्गी लावावी; परंतु तसे होताना दिसून येत नाही.
रबी हंगामापाठोपाठ आता खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच महावितरणकडून केल्या जाणाऱ्या कमी दाबाच्या व खंडित वीजपुरवठ्यामळे येथील शेतकरी संकटात सापडला आहे. लागवड केलेल्या कापसाला जास्त दिवस झाले तर जमिनीतील किडेच कापसाचे बियाणे फस्त करतील. यामुळे विहिरी व कूपनलिकामधील पाणी काय कामाचे, पाणी असून विजेअभावी पाणी देता येत नसल्यामुळे हे महावितरण निर्मित संकट आहे. म्हणून शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात असून येथील कनिष्ठ अभियंता, यांनी उंटावरून शेळ्या हाकण्यापेक्षा प्रत्यक्ष जनमित्रासमवेत लाइनवर जाऊन वीजपुरवठा सुरळीत करावा. हवेचे कारण पुढे करून शेतकऱ्यांचे नुकसान करू नये.
कर्ले फिडरवरील कलवाडे शिवारात तर नेहमीच कमी दाबाने वीजपुरवठा होत असतो. यामुळे येथील कापूस लागवड धोक्यात सापडली आहे. शेतकरी दिवसभर रोहित्रावर फेऱ्या मारताना दिसून येत आहे. यामुळे एकदाचा तांत्रिक बिघाड शोधून दुरुस्त केला पाहिजे. येथील कैफियत मांडण्यासाठी शेतकरी विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात जातात तर तेथे साहेब राहत नाहीत. येथील कनिष्ठ अभियंता भ्रमणध्वनी उचलण्याची साधी तसदी घेत नसल्याचे शेतकरी सांगतात. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून त्वरित विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास मोर्चाचा येथील शेतकऱ्यांनी इशारा दिला आहे.
प्रतिक्रिया....
मागील तीन-चार दिवसांपासून वीजपुरवठा सुरळीत चालत नाही. एकदाचा तांत्रिक बिघाड शोधून बिघाड दुरुस्त झाला पाहिजे. यामुळे नुकताच लागवड केलेला कापूस संकटात सापडला आहे. पाणी असून विजेअभावी पाणी देता येत नाही. तक्रारीची कोणी दखल घेत नाही. दिवसभर डीपीवर चकरा माराव्या लागतात. दिवसा वीजपुरवठा झाला म्हणून कापूस लागवड केली. रात्री बिघाड झाला तर रात्रभर लाइट येत नाही. एक-दोन तासांत भरणे होत नाही.
-नरेंद्र दामू खंडेराव,
शेतकरी, मालपूर, ता. शिंदखेडा