लोकमत न्यूज नेटवर्कतिसगाव : तापमानाचा पारा घसरल्याने टरबूज, गिलके, कारले, पोकळा आणि वेलवर्गीय भाजीपाला पिकाला त्याचा फटका बसला आहे. धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे वाढत्या थंडीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकºयांना नेहमीच सोसावा लागत आहे. यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. यामुळे बळीराजा अगोदरच बेहाल झाला आहे. त्यात कमी पावसामुळे धुळे तालुक्यातील शेतकºयांनी भाजीपाला संकरित प्लांट मोठ्या प्रमाणावर घेतले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी पडत असल्यामुळे ऐन बहरात आलेली पिके करपून गेली आहेत. अजून दोन- तीन दिवसात ही पीके वाळून जातील, अशी परिस्थिति आहे.सर्वाधिक फटका टरबूज, गवार, गिलके, कारले, पोकळा, बाजरी, मिरची, भेंडी या पिकांना बसला आहे. तिसगाव येथील भूषण सुभाष पाटील यांच्या टरबूज प्लांटचे मोठे नुकसान झाले असून देवभाने येथील माजी सरपंच संजय देसले व राजेंद्र देविदास देसले यांच्या एक एकर क्षेत्रातील गवार पिक आलेच नाही. वेलवर्गीय कारले, गिलके यांची फुलधारणा गळून पाने कोमजून जात आहेत. तर गोंदूर येथील अविनाश भदाणे यांनी दीड एकर क्षेत्रावर लागवड केलेल्या बाजरीची उगवण क्षमता कमी होऊन पाने पिवळी पडली आहेत, याचप्रमाणे असंख्य शेतकºयांचे वाढत्या थंडीमुळे नुकसान झाले आहे. यामुळे चिंता वाढली आहे. ऐन हातातोंडाशी आलेली पिके या अस्मानी संकटात सापडली असून कृषि विभागाने या पिकांची पहाणी करुन शासनाकड़ून नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकºयांकडून होत आहे.
थंडीमुळे पिकांना भरली हुडहुडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2019 10:14 PM