लोकमत आॅनलाईन शिंदखेडा : तालुक्यातील पाटण येथील घरकुल व शौचालय योजनांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत गेल्या १६ मार्चपासून उपोषणास बसलेल्या पाटण येथील ग्रामस्थांची प्रकृती खालावली असून वजनातही घट झाली आहे. नव्याने नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नसून जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) ए.जे. तडवी यांनी शुक्रवारी उपोषण कर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. जोपर्यंत संबंधित दोषींवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचे उपोषणकर्त्यांनी चर्र्चेसाठी आलेल्या उपकार्यकारी अधिकारी तडवी यांना सांगितले. शुक्रवारी या आंदोलनास आठवडा पूर्ण झाला. त्यामुळे उपोषणकर्त्या ग्र्रामस्थांच्या वजनात सरासरी ५ किलो घट झाली आहे. चौकशी समितीला दप्तरही मिळेनाया प्र्रकरणी नेमलेल्या नवीन चौकशी समितीला संबंधित ग्रामसेवक सूर्यवंशी यांनी अद्याप दप्तरच उपलब्ध करून दिले नसल्याचे समजते. याबाबत ग्रा.पं. विस्तार अधिकारी संतोष सावकारे यांना याबाबत विचारले असता त्यांनीही दुजोरा दिला.पाटण येथील ग्रा.पं.ने गावातील वैयक्तिक शौचालय व घरकुल योजनेत भ्रष्टाचार केल्याची तक्रार जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारीे, पं.स.गटविकास अधिकारी शिंदखेडा यांच्याकडे गेल्या तीन महिन्यांपूर्वी केली होती. त्यावेळी चौकशीसाठी समिती नेमली. मात्र तिचाही अहवाल दिला गेलेला नाही. समितीने थातूरमातूर चौकशी केल्याचा आरोप करत सात जणांनी येथील पं.स.च्या आवारात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. शुक्रवारी उपोषणाचा सातवा दिवस होता. उपोषण सुरू झाल्याच्या दुस-याच दिवशी जि.प. सीईओंनी नवीन चौकशी समिती नेमली. त्या साठी बीडीओंनी उपोषणकर्त्यांना लेखी पत्र दिले. या चौकशीस आपण उपोषण सोडून हजर रहावे, असे त्या पत्रात नमूद केले होते. मात्र उपोषणकर्त्यांनी त्यास विरोध करत गुन्हा दाखल होईपर्यंत उपोषण सुरू राहील, असे सांगितले. आम्ही उठलो की आमचे उपोषण सुटेल. तुम्हाला काय चौकशी करायची आहे ती करा आम्ही सर्व पुरावे दिले आहेत. तसेच ज्या सरपंचाविरोधात आमची तक्रार आहे त्यांनाच चौकशी समिती आपल्यासोबत घेऊन फिरत असल्याचा आरोपही उपोषणकर्त्यांनी केला. बीडीओंनी पाच दिवसांत समितीचा अहवाल देऊ, असे पत्र पुन्हा सातव्या दिवशीही दिल्याने उपोषणकर्ते संतापले. त्यामुळे आमच्या मृत्यूची प्रतीक्षा करत आहात का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.