धुळे : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी धुळ्यात १ डिसेंबर २०२३ पासून जेलरोड येथे साखळी उपोषण करण्यात येणार आहे, तर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे - पाटील यांची डिसेंबरमध्ये धुळ्यात सभा होणार आहे. या सभेसाठी समिती गठीत करण्याचा निर्णय मराठा सेवा संघाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
साखळी उपोषणाकरिता संपूर्ण जिल्हाभर जनजागृती करण्यात येईल. समितीमध्ये आमदार, खासदार व राजकीय पक्षांचे जिल्हाप्रमुख यांना घेतले जाणार नाही. समाजात काम करणारे मराठा समाजाचे सामाजिक कार्यकर्ते यांची निवड केली जाईल. समितीमध्ये कोणालाही अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव अशी पदे देण्यात येणार नाहीत. फक्त सकल मराठा समाज, धुळे जिल्हा समन्वयक असा उल्लेख करण्यात येईल.
मनोज जरांगे - पाटील यांच्या सभेबाबत व उपोषणाबाबत साक्री शिदखेडा, शिरपूर पिंपळनेर, दोंडाईचा व धुळे तालुका शहर व आजुबाजुच्या जिल्ह्यातील जवळील तालुके येथील मराठा समाजाने ग्रामीण व शहरी भागात घरोघरी जाऊन संपर्क साधावा, असे या बैठकीत सर्वानुमते ठरविण्यात आले. बैठकीत मराठा समाज आणि मनोज जरांगे - पाटील यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे मंत्री छगन भुजबळ यांचा निषेध करण्याचा ठराव करण्यात आला.