लोकमत न्यूज नेटवर्कधुळे/दोंडाईचा: बाप्पाच्या आगमनानंतर आता टप्या-टप्याने गणेश मूर्तींचे विसर्जन होऊ लागले आहेत. विसर्जनाच्या दुसऱ्या टप्यात २८ रोजी जिल्ह्यात ५९ श्रींच्या मूर्तीचे विसर्जन होणार आहे. दरम्यान दोंडाईचा येथे सर्वात जास्त ३२ मंडळांच्या मूर्तीचे विसर्जन होणार असून, विसर्जनासाठी पालिकेने तीन कृत्रिम तलावांची निर्मिती केलेली आहे.जिल्ह्यात असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता गणेशोत्सव मर्यादीत स्वरूपात साजरा केला जातोय. एकाही मोठ्या सार्वजनिक मंडळाने आरास केलेली नाही. यावर्षी पाचव्या दिवसापासून गणेश विर्जनला सुरूवात करण्यात आली. विसर्जन मिरवणुकांना शासनाने यापूर्वीच बंदी घातलेली आहे. त्यामुळे अनेक मंडळांना नगरपालिका, नगरपरिषद यांनी केलेल्या कृत्रिम तलावातच मूर्तीचे विसर्जन करावे लागत आहे. सातव्या दिवशी धुळ्यातील दोन, शिरपूर शहरातील १५, दोंडाईचा येथील ३२, नरडाणा येथील ३, थाळनेर ४ व शिरपूर तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या दोन सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे.दोंडाईचाशहरात तीन ठिकाणी कृत्रिम तलाव निर्माण केले असून या ठिकाणी गणेश भक्तांनी गणपतीचे विसर्जन करावयाचे आहे .दोडाईचा नगरपालिका शहरातील सर्व गणेश मूर्तींचे दान स्वीकारणार असून त्यांचे विधिवत विसर्जन करणार आहे. नंदुरबार चौफुली म्हणजे दादावाडी जवळ, अमरावती नदीत-गुरव स्टॉप जवळ, अमरावती नदीत-सती माता मंदिर जवळ तीन कृत्रिम तलाव तयार केल्याची माहिती पालिका अभियंता जगदीश पाटील व शिवनंदन राजपूत यांनी दिली .या ठिकाणी गणेश भक्तांनी गणेश मूर्तीचे दान करावयाचे आहे. निर्माल्यसाठी तेथे घंटागाडी, ट्रॅक्टर उभे केले आहे. निर्माल्य आणून त्या ठिकाणी टाकावयाचे आहे. कोणीही गर्दी न करता,आपत्कालीन व्यवस्थापनचे पालन करून मूर्ती दान करावे,असे आवाहन मुख्याधिकारी डॉ प्रवीण निकम यांनी केले आहे.
कृत्रिम तलावात होणार ‘श्रीं’च्या मूर्तीचे विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 12:43 PM