लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : येत्या १५ दिवसात शिसाका संचालक मंडळाने सकारात्मक भूमिका घेऊन कारखाना सुरू करण्याबाबत हालचाली केल्या नाहीत. तसेच सर्वसाधारण सभा घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली नाही रास्तारोको आंदोलन करु, अशा आशयाचे निवेदन शेतकरी विकास फाऊंडेशन व शेतकºयांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांना दिले. दरम्यान, शिसाकासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकºयांनी निदर्शनेही केली. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या ६ वर्षापासून शिसाका बंद आहे़ सन २०१६ मध्ये झालेल्या कारखान्याच्या निवडणुकीत विद्यमान संचालक मंडळाने कारखाना सुरू करण्याचे आश्वासन दिले होते़ परंतु दीड वर्षाचा कालावधी उलटूनही त्यांनी कारखाना सुरू करण्याबाबत कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही़ अनेक वेळा शेतकरी व विविध संघटनांनी तक्रारी केल्या आहेत़ थकीत कर्जापोटी साखर कारखाना जिल्हा बँकेने जप्त केलेला आहे़ कर्ज वसुली प्राधिकरण न्यायालयाने ही जप्ती बेकायदेशीर ठरविल्यानंतर जिल्हा बँक कारखान्याचा ताब्या द्यायला तयार आहे़ कर्मचारी भविष्य निर्वाह निधी मागणीलाही न्यायालयाने स्थगिती दिली असून प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने भविष्यनिर्वाह निधी कमिश्नर कार्यालयाचा कारखाना सुरू करण्यास कोणताही अडथळा किंवा हरकत नसल्याचा निर्वाळा दिला आहे़ तसेच तालुक्यात पाणी, भौगोलिक स्थिती उत्तम असून कारखाना पूर्ण क्षमतेने चालण्या इतका ऊस उपलब्ध आहे असे असूनही संचालक मंडळ कारखाना सुरू करण्याबाबत पावले उचलत नाही़ सभासदांना कोणताही खुलासा करीत नाही, कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा घेत नाही़ गेल्या आठवड्यात एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण देखील करण्यात आले़परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही, असे निवेदनात म्हटले आहे. जिल्हाधिकारी यांना निवेदन देतांना किविप्र संस्थेचे अध्यक्ष तुषार रंधे, शिसाका संचालक डिगंबर माळी, भाजपा तालुकाध्यक्ष राहुल रंधे, अशोक श्रीराम, मोहन पाटील, अॅडग़ोपालसिंग राजपूत, दिलीप लोहार, प्रा़पी़एस़अंतुर्लीकर, अॅड़शांताराम महाजन, दिनेश मोरे, रूपसिंग चौधरी, डॉ़जितेंद्र ठाकूर, रजेसिंग राजपूत, भरतसिंग राजपूत, चंद्रकांत पाटील, मिलींद पाटील, अॅड़अमित जैन, चंदनसिंग राजपूत, राजूअण्णा गिरासे, प्रशांत पाटील, राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते़
शिरपूर साखर कारखाना सुरू न झाल्यास ‘रास्ता रोको’ करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 6:48 PM
शेतक-यांचा इशारा : जिल्हाधिकारी कार्यालयात केली निदर्शने
ठळक मुद्देशेतक-यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने केली. शिसाका सुरू करण्यासाठी १५ दिवसाची मुदत.शिसाका सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा