धुळे : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई करून जप्त केलेल्या एकूण ३९ लाखांचा अवैध दारूसाठा नष्ट करण्यात आला़ याप्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर प्रथम वर्ग न्यायाधीश पी़ एस़ भंडारी यांनी साठा नष्ट करण्याचे आदेश दिले़ त्यानुसार मंगळवारी दुपारी नरडाणा पोलीस ठाणे आवारात दारूसाठा नष्ट करण्यात आला़ पोलीस अधीक्षक एम. रामकुमार व अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध दारू व्यवसायाविरोधात मोहीम राबविली जात आहे़ तसेच जप्त केलेला दारूसाठा नष्ट करण्याची कार्यवाहीसुद्धा सुरू करण्यात आली आहे़ त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जिल्ह्यात विविध ठिकाणी कारवाई करून अवैध दारूसाठा जप्त केला होता़ त्याची एकूण किंमत ३९ लाख २९ हजार ५२० रुपये निष्पन्न करण्यात आली़जप्त केलेला मुद्देमाल तपासादरम्यान नरडाणा पोलीस ठाण्यात ठेवण्यात आला होता़ गुन्ह्याच्या तपासात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले़. त्यानंतर प्रथम वर्ग न्यायाधीश पी़ एस़ भंडारी यांनी जप्त केलेला दारूसाठा नष्ट करण्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभाग व नरडाणा पोलीस ठाण्याला दिले होते़ उत्पादन शुल्क विभागाचे लेखी आदेश प्राप्त झाल्यानंतर दारूसाठा नष्ट करण्याची कार्यवाही करण्यात आली़ तंबू उभारून कार्यवाहीदारूसाठा नष्ट करण्यासाठी उन्हाच्या तीव्रतेमुळे नरडाणा पोलीस ठाणे आवारात तात्पुरता तंबू उभारण्यात आला होता़ १० ते १५ कामगारांना बोलविण्यात आले होते़ तसेच एक खड्डा करण्यात आला होता़ बाटल्यांमधील दारू त्या खड्ड्यात ओतून नष्ट करण्यात आली़ या कामासाठी जवळपास संपूर्ण दिवस लागला़
३९ लाखांचा अवैध दारूसाठा नष्ट
By admin | Published: May 25, 2017 1:04 AM