धुळे : तालुक्यातील आनंदखेडे शिवारात गेल्या आठवडाभरापासून बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे. बिबट्याने आठवडाभरात तीन गुरांवर हल्ला केल्यामुळे, शेतकरी बांधवांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी, गावकऱ्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे.
देऊर गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या आनंदखेडे गावाच्या शेत-शिवारामध्ये शेतकरी शिवदास अमृतसागर यांच्या शेतातील शेडमध्ये २८ मार्चला बिबट्याने गाईच्या पिलावर हल्ला करून ठार केले होते. दुसऱ्या घटनेत शनिवारी मध्यरात्री शेतकरी हेमलाल लाला भोई व शामराव भोई यांच्या शेतातील गायींवरही हल्ला करून, दोन गायी बिबट्याने ठार केल्या होत्या. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून, ज्या शेतकऱ्यांचे पशुधनाचे नुकसान झाले आहे, त्यांना पंचनाम्यानुसार त्वरित मोबदला देण्याची मागणी गावकऱ्यांमधुन केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच धुळे वनविभागाचे वन परिमंडळ अधिकारी निंबा आखाडे व वनरक्षक बी. के.निकम यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.