धुळे : येथील जिल्हा रुग्णालयाच्या मुख आराेग्य विभागातर्फे एप्रिल २०२२ ते २० मार्च २०२३ या कालावधीत ३ हजार ५५३ बालकांची मुख आरोग्य तपासणी करून त्यांच्या दाढांमध्ये सिलेंट भरण्यात आले. कर्करोग निर्मूलनासाठी शासनाकडून सील ॲण्ड स्माईल उपक्रम राबवला जात आहे. अंगणवाडी व प्राथमिक शाळेतील बालकांची जिल्हा रुग्णालयाच्या पथकातर्फे मुख आरोग्य तपासणी केली जाते.
दातांमध्ये कीड व इतर त्रास असलेल्या बालकांना जिल्हा रुग्णालयात संदर्भित केले जाते. याठिकाणी बालकांवर आवश्यकतेनुसार उपचार केले जातात. दातांमध्ये कीड असेल, तर ती संपूर्णपणे काढली जाते व त्याठिकाणी सिलेंट भरले जाते. स्वस्थ मुख असेल, तर आरोग्य निरोगी राहते; पण स्वस्थ मुख नसेल, तर प्रकृतीच्या अनेक समस्या निर्माण होतात. हृदयविकार, श्वसनाचे आजार होण्याचा धोका असताे. त्यामुळे लहान वयातच दात व हिरड्यांची योग्य काळजी घेतल्यास निरोगी आयुष्य जगण्यास मदत होत असल्याचे जिल्हा मुख आरोग्य अधिकारी डॉ. नितीन पाटील यांनी सांगितले.
१०३ पाेलिसांची तपासणी जिल्हा मुख आरोग्य विभागातर्फे पोलिस मुख्यालयातील १०३ कर्मचारी व अधिकाऱ्यांची मुख तपासणी करण्यात आली. मुख कर्करोगाबाबत जनजागृती करण्यात आली. तंबाखू, गुटखा यांच्या सेवनामुळे अनेक नागरिकांचे मुख आरोग्य बिघडले आहे. गुटख्याच्या सेवनामुळे मुखाच्या कर्करोगाचा धोका असतो, त्यामुळे गुटखा खाणे टाळावे. याबाबत जिल्हा आरोग्य विभागाकडून जनजागृती करण्यात आली.
शिरपूर, पिंपळनेर येथे आरोग्य शिबिर मौखिक आरोग्याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता यावी, यासाठी आरोग्य विभागाकडून शिबिर घेतले जात आहे. शिरपूर व साक्री तालुक्यातील दुर्गम भागात आरोग्य शिबिरांचे आयोजन करून मुख आरोग्याबाबत जनजागृती केली जात आहे. तसेच विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी लागाव्या, त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी शिक्षकांचे प्रशिक्षण घेण्यात आले.
मुख आरोग्य दिनानिमित्त कार्यक्रम मुख आरोग्य दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कांचन वानेेरे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वप्निल पाटील आदी उपस्थित होते. चांगल्या मौखिक आरोग्यासाठी दोनवेळा ब्रश करणे आवश्यक आहे. दोन जेवणांच्या मध्ये गोड व चिकट पदार्थ खाणे टाळावे. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणे टाळावे.