धुळे : गेल्या तीन-चार वर्षांपासून दुष्काळाचा सामना कराव्या लागणाऱ्या धुळे जिल्ह्यात यावर्षी दमदार पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्याच्या भूजल पातळीत तब्बल १.७३ मीटरने वाढ झालेली आहे. भूजन सर्वेक्षण व विकास यंत्रणेमार्फत सप्टेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यातील १०७ निरीक्षण विहिरींची पहाणी केल्यानंतर ही परिस्थिती आढळून आली. भूजल पातळीत वाढ झाल्याने पुढील वर्षी जिल्ह्याला पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता जवळपास कमीच आहे.गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने, सर्वच तालुक्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. पाणी टंचाईच्या निवारणार्थ जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला आॅक्टोबर महिन्यापासूनच टंचाईचा आराखडा तयार करावा लागत होता. जिल्हयात धुळे, शिंदखेडा या तालुक्यातील अनेक गावांना टॅँकर, विहिर अधिग्रहण करूनच पाणी पुरवठा करावा लागत होता. जिल्ह्यात कमी पावसामुळे भूजल पातळीतही मोठ्या प्रमाणात घट आहे़ मात्र यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नदी-नाले, विहिरी तुडूंब भरल्या. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत सप्टेंबर २०१९ अखरेपर्यंत झालेल्या पावसानंतर जिल्ह्यातील १०७ निरीक्षण विहिरींच्या नोंदी घेतल्या. यात धुळे तालुक्यातील ३३, साक्री तालुक्यातील ३१, शिंदखेडा तालुक्यातील २५ व शिरपूर तालुक्यातील १८ विहिरींचा समावेश आहे. या १०७ विहिरींच्या नोंदीनुसार जिल्ह्याच्या भूजल पातळीत १.७३ मीटरने वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.टंचाईची झळ कमी बसणारधुळे जिल्हा हा अवर्षण प्रवण भागात असल्याने, जिल्ह्यातील अनेक गावांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत असतो. मात्र यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने, जिल्हयात पाणी टंचाईची झळ बसणार नाही असा अंदाज आहे. टंचाईची झळ बसलीच तर ती अगदी शेवटच्या टप्यात जाणवू शकते. मात्र टंचाईग्रस्त गावांची संख्या खूपच कमी राहण्याची शक्यता आहे.प्रतिक्षेनंतर दिलासाअनेक वर्षाच्या प्रदिर्घ प्रतिक्षेनंतर यंदा जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे़ त्यामुळे प्रकल्प शंभर टक्के भरल्याने शेतकऱ्यांना शेती पिकांसाठी उपलब्ध जलसाठ्यातून मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणारा आहे़ तर पाणीप्रश्न देखील सुटणार आहे़
भूजल पातळीत १.७३ मीटरने वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2019 10:44 PM