धुळे: राज्य शासनाने एसटीने प्रवास करणाऱ्या महिलांना तिकिटात सरसकट ५० टक्के सवलत दिल्याने त्याचा फटका खासगी प्रवासी वाहतुकीला बसला आहे. त्यामुळे टॅक्सीचालकांना व्यवसाय कर माफ करावा. तसेच टॅक्सी चालकांच्या सुशिक्षित मुला-मुलींना एसटी महमंडळात सामावून घ्या, अशी मागणी धुळे शहर टॅक्सी मालक-चालक संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केलेली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धुळे शहरातून १९८०-८१पासून नंदुरबार, अमळनेर, जळगाव, मालेगाव, चाळीसगाव मार्गावर ११४ टॅक्सी धावत असून, त्यामाध्यमातून जवळपास दीड हजार चालकांचा उदरनिर्वाह सुरू आहे. राज्य शासानने एसटीतून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकिटात सरसकट ५० टक्के सवलत दिल्याने त्याचा परिणाम व्यवसायावर झालेला आहे. प्रवासी संख्या कमी झालेली आहे. त्यामुळे काही चालकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे, असं निवेदनात म्हटलंय.
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी टॅक्सीला टोल फ्री करण्याची घोषणा केली होती. त्याचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे टॅक्सीला टोल फ्री करण्यात यावे. टॅक्सीला पर्यावरण करातून सूट द्यावी, टॅक्सी वाहनासाठी लागणारा जाचक कर माफ करावा, टॅक्सी चालकांच्या सुशिक्षित मुला-मुलींना एसटी महामंडळात अथवा तस्सम सेवा देणाऱ्या महामंडळात नोकरीसाठी समावून घ्यावे अशी मागणी केली आहे.