Dhule Police bangladeshi News: बेकायदेशीर मार्गाने भारतात घुसखोरी करत धुळ्यापर्यंत पोहोचलेल्या चार बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली. धुळे शहरातील न्यू शेरे पंजाब लॉजमध्ये ते वास्तव्याला होते. पोलिसांना त्यांच्याबद्दलची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.
धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चारही बांगलादेशी कामाच्या शोधात भारतात आले होते. इथेच कायम राहण्याच्या विचारात ते होते.
बांगलादेशींना पोलिसांनी कसे पकडले?
लॉजमध्ये चार नागरिक राहत असून, ते बांगलादेशातून आले असावेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची पोलिसांनी रेकी करून खातरजमा करून घेतली. त्यानंतर रविवारी (२२ डिसेंबर) पोलिसांचे पथक लॉजवर गेले. त्यावेळी लॉजमधील खोली क्रमांक १२२ मध्ये चौघेही होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
ते चार बांगलादेशी घुसखोर कोण?
धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद शेख, इरफान रफिक शेख, शिल्पी शेख आणि ब्युटी बेगम शेख, अशी बांगलादेशी घुसखोरांची नावे आहेत. ते चौघेही बांगलादेशातील महिदीपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौघांनाही अटक करण्यात आली आहे. परदेशी नागरिक कायदा आणि पासपोर्ट कायद्यान्वये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला गेला असल्याचे पोलिसांनी सांगितले. धुळे पोलीस आणि एटीएसने संयुक्तपणे ही कारवाई केली.
मोहम्मद शेख आणि शिल्पी शेख हे दोघे पती-पत्नी असल्याचे पोलिसांनी सांगितले. चौघांकडे वैध कागदपत्रे नाहीत. बेरोजगारीला कंटाळून ते भारतात आले होते. मिळेल तिथे काम करून भारतातच कायमचे स्थायिक होण्याच्या प्रयत्नात ते होते, असे पोलीस चौकशीतून समोर आले.
पोलिसांनी त्यांच्याकडून ४० हजार रुपये किंमतीचे चार फोन जप्त केले आहेत. चौघेही त्यांच्या नातेवाईकांशी बोलण्यासाठी मोबाईलमधील आयएमओ हे अॅप वापरत होते, असेही तपासातून समोर आले आहे. चौघांविरुद्ध आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.