धुळे : जिल्ह्यातील सर्व समाजाच्या अध्यक्षांनी कोरोनामुळे एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या आपापल्या समाजातील बालकांची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, धुळे यांच्याकडे सादर करावी, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी हेमंतराव भदाणे यांनी केले आहे.
कोरोना रोगामुळे बालकांची काळजी व संरक्षणाचे काम करणाऱ्या संस्थांमधील बालकांची व कोरोनामुळे एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना तसेच दोन्ही पालकांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे विलगीकरणात असणाऱ्या बालकांच्या समस्या निर्माण होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. ज्या बालकांच्या एक किंवा दोन्ही पालकांचा मृत्यू झालेला आहे. तसेच कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने समाजाकडून मदत होत नसल्याने बालके असुरक्षित बनत आहेत. अशा बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देत त्यांच्या यथायोग्य संगोपनासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स गठित करण्यात आला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महिला व बालविकास विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कोरोनामुळे एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या एकूण ४५ बालकांची ओळख झालेली आहे. अद्यापही समाजात अशी बरीच बालके असण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व समाजाच्या अध्यक्षांनी आपापल्या समाजातील दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची माहिती सादर करावी.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय (प्लॉट क्रमांक ५२, जयहिंद कॉलनी, देवपूर, धुळे) येथे सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.