न्याहळोद : धुळे तालुक्यातील बिलाडी येथे स्वाइन फ्लू आजाराने रुग्ण सुनील पाटील यांचा मृत्यू झाला. त्यांची स्वाइन फ्लू चाचणी पॉझिटिव्ह आल्याने गावात चिंतेचे वातावरण पसरले आहे. याबाबत ‘लोकमत’मधून वृत्त प्रसिद्ध होताच संपूर्ण आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. जिल्हा परिषदेचे जिल्हा साथ रोग नियंत्रण पथक गुरूवारी तत्काळ बिलाडी येथे पाहणी व प्रतिबंधात्मक उपचारासाठी दाखल झाले. हे पथक आठ दिवस स्थितीवर लक्ष ठेवून राहणार आहे.गुरूवारी संपूर्ण गावात ताप, घसा दुखणे, अंगदुखी अशी लक्षणे जाणवणाऱ्या रुग्णांची तपासणी करण्यात आली. मृत्यू झालेल्या रूग्ण सुनील पाटील यांच्या पत्नीस हिरे वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले. तर अन्य घरांमधील सदस्यांवर प्राथमिक उपकेंद्रात उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले.जिल्हा परिषदेचे आरोग्य पथक, तालुका आरोग्य अधिकारी व नगाव आरोग्य केंद्राचे अधिकारी या पाहणीसाठी उपस्थित होते. हा कार्यक्रम आठ दिवस चालणार आहे. तर शुक्रवार २२ रोजी बिलाडी येथे या संदर्भात विशेष ग्रामसभा घेण्यात येणार आहे.जिल्हा परिषदेच्या जिल्हा साथ रोग नियंत्रण पथकात वैद्यकीय अधिकारी आर. व्ही. पाटील, जिल्हास्तरीय पर्यवेक्षक प्रकाश देवरे, उदय पाटील व पंचायत समितीच्या आरोग्य अधिकारी तरन्नुम पटेल उपस्थित असून उपाययोजना करण्यात येत आहेत.घरातील सदस्यांना नमुना अहवाल किंवा रोग निदान होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपचार चालू केले जातात . हिवाळा व उन्हाळा या ऋतू बदलामुळे या दिवसात हे रुग्ण आढळतातअभिजित महाजनवैद्यकीय अधिकारी, मुंबई
स्वाईन फ्ल्यूने रूग्ण दगावताच बिलाडी येथे उपाययोजना सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 10:53 PM