धुळे : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी महानगरपालिकेने शहरातील डॉक्टरांच्या मदतीने मनपाच्या शाळांमध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हिरे वैद्यकीय महाविद्यालयावर पडणारा ताण काहीसा कमी होणार आहे.बुधवारी नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा), युनानी मेडिकल व होमिओपथी डॉक्टर्स असोएशनच्या वैद्यकीय व्यवसायिक व प्रतिनिधीची बैठक आयुक्त अजिज शेख यांनी घेतली़ शहरात विविध भागातील २० मनपा शाळांच्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात रुग्णांची तपासणी व स्क्रिनिंग व ओषध उपचारासाठी ओपीडी सुरु करण्यात येणार आहे. यात सर्वसामान्य आजार असलेल्या रुग्णांची थर्मल स्कॅनरव्दारे तपासणी केली जाईल़ आवश्यकता असल्यास व लक्षणे असल्यास पुढील वैद्यकीय सेवा तसेच उपचार ही केले जातील. त्यामुळे सर्वोपचार रुग्णालयावरील वाढता ताण कमी होऊन नागरिकांना त्यांच्याच भागात वैद्यकीय सेवा उपलब्ध होईल. वैद्यकीय प्रतिनिधी व संघटनांच्या प्रतिनिधींनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद देत सामाजिक बांधिलकीतून शहरातील नागरिकांसाठी वैद्यकीय सेवा देण्याचा निर्णयाचे कौतुक केले़ मनपातर्फे सदर ठिकाणी आवश्यक त्या सुविधा संरक्षणात्मक साहित्य तसेच औषधी साठा, कर्मचारी वर्ग देण्यात येत आहे. मनपाच्या दालनात झालेल्या बैठकीस निमाचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील, डॉ. हेमंत भदाणे, डॉ. अमित खैरनार, युनानी मेडिकल असो.चे डॉ. जहुर अन्सारी, डॉ. जियाउल रहेमान अन्सारी, डॉ सरफराज अन्सारी, होमिओपॅथी डॉक्टर्स असो.चे डॉ. किशोर कासोदेकर डॉ. संजय बोरसे, डॉ. पराग पवार यांच्यासह अनेक डॉक्टर उपस्थित होते.
रूग्णसेवेसाठी डॉक्टरांनी घेतला पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 10:42 PM