लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत २०१७-१८ या वर्षात जिल्हास्तरावर प्रथम व द्वितीय प्राप्त करणाºया दोन गावांची विभागस्तरीय तपासणी समितीने नुकतीच पहाणी केलेली आहे. या पहाणीचा अहवाल शासनाकडे देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. बहुतांश आजार हे अशुद्ध पाणी, अस्वच्छ परिसर आणि वैय्यक्तिक स्वच्छतेचा अभाव यामुळे होतात, हे लक्षात घेऊन राज्य शासनाने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सुरू केलेले आहे. राज्यात ग्रामीण स्वच्छतेची व्यापी वाढविण्यासाठी हे अभियान आहे. या या अभियानात सहभागी होणाºया ग्रामपंचायतींना ग्रामपंचायत, जिल्हास्तर, विभागीय व राज्यस्तरीय पुरस्कार देवून गौरविण्यात येते. प्रत्येक पुरस्काराची रक्कम मोठ्या प्रमाणात असल्याने, त्या रकमेतून गावांचा विकास करणे शक्य झालेले आहे.जिल्ह्यात २०१७-१८ या वर्षात हे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले होते. त्यातून जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार अजंदे (ता. शिरपूर) गावाला, तर द्वितीय क्रमांक परसमाळ (ता. शिंदखेडा), तृतीय क्रमांकाचा पुरस्कार (विभागून) धुळे तालुक्यातील खंडेलाय खुर्द, विसरणे या गावांना देण्यात आला होता. जिल्हास्तरावर प्रथम पुरस्कार ५ लाख द्वितीय पुरस्कार तीन लाख व तृतीय क्रमांकाचा पुरस्कार दोन लाखांचा होता. दरम्यान जिल्हास्तरावर प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त गावांची निवड विभागस्तरीय पुरस्कारासाठी करण्यात येत असते. यासाठी अजंदे व परसामळ या दोन गावांची तपासणी करण्यासाठी विभागस्तरीय समिती नुकतीच जिल्हा दौºयावर आली होती. या समितीमध्ये नंदुरबार जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर पठारे, विभागीय शाखेचे आयुक्त राजेश देशमुख (नाशिक), माहिती व जनसंपर्क विभागाचे उपसंचालक डॉ. किरण मोघे (नाशिक), महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाचे सहायक अधीक्षक अभियंता पी.जी.बिराजदार (नाशिक) यांचा समावेश होता. या समितीने ग्रामपंचायतीचे वेगवेगळ्या प्रकारचे दप्तर, गावातील शौचालये, शाळा, अंगणवाडी, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, परिसर स्वच्छता आदींची पहाणी केली. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान विभागीय पुरस्कारासाठी विभागात धुळ्यासह नाशिक,नंदुरबार, नगर, जळगाव या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. या पाचही ठिकाणची तपासणी झाल्यानंतरच शासनाला अहवाल सादर होणार आहे. विभागीस्तरीय पहिला पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतीला १० लाख, द्वितीय क्रमांक प्राप्त ग्रामपंचायतीला ८ तर तृतीय क्रमांक प्राप्त ग्रामपंचायतीला ६ लाखांचा पुरस्कार देण्यात येत असतो. दरम्यान विभागीय समिती समवेत धुळे जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वाघ, शिरपूरचे गटविकास अधिकारी शिंदे, विस्तार अधिकारी आर.डी. महिंदळे, शिंदखेड्याचे विस्तार अधिकारी संतोष सावकारे, पी.टी.चौधरी, संतोष देव, पाणी पुरवठा विभागाचे संतोष नेरकर, वैभव सयाजी उपस्थित होते.
जिल्ह्यातील दोन गावांची विभागीय समितीकडून तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 5:01 PM