धुळे : महाविद्यालयीन जीवनात पक्ष्यांची ओळख झाली. आणि मी त्यांच्या प्रेमातच पडलो. तेच मला पक्षी निरीक्षणासाठी भटकंती करण्यास प्रेरणादायी ठरली, अशी भावना येथील पक्षीतज्ञ व अभ्यासक डॉ.विनोद भागवत यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.पक्ष्यांसाठी लागलेली भटकंतीची सवय अद्याप टिकून आहे. त्या साठी देशभरातील प्रमुख राज्यात असलेल्या अनेक अभयारण्यांसह जंगल, डोंगर, दऱ्या, नदी आणि समुद्र किनारे अशा ठिकाणी वेळ मिळेल तसा फिरलो आहे आणि आजही फिरण्यास जातो, असेही भागवत यांनी आवर्जून सांगितले. निसर्गातील अनेक गूढ गोष्टी, गुपीते मला पक्ष्यांनी सांगितली. त्यातील अनेक गोष्टी मला पक्षी निरीक्षणाच्या सातत्यपूर्ण वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरल्या, असेही ते म्हणाले.मला तसे सर्वच पक्षी भावतात. परंतु त्यात सारस क्रौंच पक्षी अधिक आवडतो. स्वर्गीय नर्तक जणू अप्सराच भासते. रोहित तर राजबिंडा हिरोच जाणवतो. मलबारी शैलकस्तुराच्या गायनाला तर तोडच नाही. नीरव, शांत जंगलात अनेक पक्ष्यांचे गायन ऐकताना स्वर्गसुखाची अनुभूती होते, असेही भागवत यांनी सांगितले.पक्षी निसर्गाचा अनमोल ठेवा असून त्याचा आनंद पुढील अनेक पिढ्यांनाही मिळावा, ही प्रामाणिक इच्छा असून त्यासाठी प्रबोधनाच्या माध्यमातून सतत प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पक्ष्यांवरील प्रेम भटकंतीस प्रेरणादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 12:07 AM