धुळे : लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चौथ्या टप्प्यात होणार असून सध्या उमेदवारांच्या नावाबाबत प्रचंड उत्सुकता आहे. उमेदवारांच्या नावांची अद्याप घोषणा न झाल्याने विविध नावांसंदर्भात चर्चा होत आहे.गेल्यावेळी भारतीय जनता पक्षातर्फे केलेल्या सर्व्हेनुसार सध्याचे खासदार डॉ.सुभाष भामरे यांचे नाव जाहीर करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेत निवडणूक जिंकल्यानंतर त्यांचा केंद्र सरकारात समावेश करून त्यांना महत्त्वपूर्ण संरक्षण मंत्रालयाचे राज्यमंत्री करण्यात आले. यावेळीही तेच पक्षाचे अधिकृत उमेदवार राहतील, अशी चर्चा सुरू आहे. इतरही काही नावे चर्चेत आहेत. मात्र त्यास दुजोरा मिळालेला नाही. तर दुसरीकडे प्रतिस्पर्धी कॉँग्रेस-राष्टÑवादी कॉँग्रेस आघाडीतर्फे माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे नाव निश्चित असल्याचे मानले जात आहे.मात्र या दोन्ही उमेदवारांच्या नावांची घोषणा पक्षातर्फे अधिकृतपणे झालेली नाही. त्यामुळे प्रचंड उत्सुकता व्यक्त होत आहे. येथील निवडणूक चौथ्या टप्प्यात असल्याने पक्षांनी पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या मतदारसंघातील उमेदवारांच्या घोषणेवर सध्या भर दिल्याचे सांगण्यात येत आहे.कॉँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या येथील सभेनंतर धुळे ग्रामीण मतदारसंघाचे विद्यमान आमदार व रोहिदास पाटील यांचे पुत्र कुणाल पाटील यांच्यासह डॉ.तुषार शेवाळे यांच्या नावाचीही चर्चा होत आहे. सुरूवातीस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजीराव दहिते यांचे नावही चर्चेत होते. मात्र ते मागे पडल्याचे सध्याचे चित्र आहे.समर्थकांकडून मात्र रोहिदास पाटील यांच्या नावाचाच आग्रह धरला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. या निवडणुकीसाठी आतापर्यंत केवळ अॅड.प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीतर्फे मालेगाव येथील इंजिनिअर कमाल हाशीम यांच्या उमेदवारीची घोषणा झालेली आहे.
संभाव्य उमेदवारांच्या नावाबाबत उत्सुकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 11:47 AM
धुळे लोकसभा
ठळक मुद्देविविध नावांची होतेय चर्चा