सुरेश विसपुते
धुळे - गरज ही शोधाची जननी असते, असे म्हटले जाते. याच गरजेतून शहरातील प्रथितयश मूत्र शल्यचिकित्सक डॉ. आशिष पाटील यांनी क्रबट्राईट फोरसेप उपकरणाचा आविष्कार केला आणि त्याचे पेटेंटही मिळविले.
किडनीतील खडे फोडण्याचे उपकरण या आधीच उपलब्ध आहे. मात्र ते फोडताना खडे पकडण्याचे उपकरण जगभरात कोठेच उपलब्ध नव्हते. खडे पकडण्याचे उपकरण नसल्याने खडे फोडण्याचे ऑपेरेशन करतेवेळे ते दूर सरसावत व किडणीत इतरत्र होत. यामुळे कडक स्टोन (खडे) तोडणे कठीण होत होते. नेमकी हीच गरज ओळखून डॉ. पाटील यांनी संशोधनास सुरुवात केली. अथक परिश्रमानंतर क्रबट्राईट फोरसेप उपकरण जन्माला आले. क्रबट्राईट फोरसेपची विविध अंगाने चाचणी केल्यानंतर डॉ. पाटील यांनी त्यास पेटेंट दाखल केले.
शासनाच्या पेटेंट कार्यालयातर्फे उपकरणाची सखोल चाचणी करण्यात आली. त्यानंतर पेंटट प्रदान करण्यात आले. पेटेंचे प्रमाणपत्र डॉ. पाटील यांना नुकतेच प्राप्त झाले. पेंटटप्राप्तीनंतर डॉ. पाटील यांच्या तेजनक्ष इन्व्होशनच्या माध्यमातून क्रबट्राईट फोरसेप उपकरणाची निर्मिती केली जाणार आहे. त्यानंतर देशासह जगभरातील मूत्रशल्यचिकित्सांना ते उपलब्ध केले जाईल. डॉ.पाटील यांच्या संशोधनाने पुन्हा एकदा धुळ्याचे नाव जागतिक नकाशावर पोहोचले आहे.
दरम्यान, डॉ. पाटील यांनी ३३ उपकरणे संशोधित केले असून यापैकी १५ उपकरणे पेटेंट दाखल आहेत. डॉ. पाटील गिनिस बुक, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्ड रेकॉर्ड अॅकॅडमीसह २१ आंतराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य पुरस्कारांनी सन्मानित आहेत. तसेच नवनवीन संशोधनासाठी दिला जाणारा डॉ. एस.एस.बापट हा राष्ट्रीय स्तरावरील पुस्कार सलग तीनवेळा पटकविणारे डॉ. पाटील देशातील एकमेव संशोधक ठरले आहेत. असे संशोधनात्मक गुण डॉक्टरांमध्ये असले तर शस्त्रक्रिया करतेवेळीदेखील रुग्णांचा फायदा होतो तसेच शस्त्रक्रिया अयशस्वी होण्याची शक्यता कमी होते.
अचूक शल्यकर्म हा संशोधनाचे मूळ उद्देश आहे. त्यासाठीच क्रबट्राईट फोरसेप उपकरण संशोधित केले आहे. या उपकरणामुळे शल्यचिकित्सकांना अचूकपणे किडणीतील खडे फोडण्यासाठी मदत होईल. संशोधनला पेंटट मिळाल्याने समाधान आहे.
- डॉ.आशिष पाटील, संशोधक व सुप्रसिद्ध मूत्र शल्यचिकित्सक, तेजनक्ष हॉस्पिटल्स, धुळे