लोकमत न्यूज नेटवर्कदोंडाईचा : दोंडाईचा-शहादा रस्त्यावरील रेल्वे उड्डाण पुलाचा कठड्यांचे खांब व लोखंडी दांड्या चार ठिकाणी तुटल्याने अत्यंत धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. चार ठिकाणी कठडे तुटून पडल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. उड्डाण पुलाची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी सर्वसामान्य जनता व वाहन धारकांनी केली आहे . सुरत - भुसावळ रेल्वे मार्गावर दक्षिण - उत्तर दिशेला उड्डाणपूल उभारला आहे . सार्वजनिक बांधकाम विभागाने या उड्डाण पुलाची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. गेल्या दोन वर्षांपासून दुरवस्था झालेल्या या पुलाच्या कठड्यांची तत्काळ दुरुस्ती करणे महत्वाचे आहे. सुरत- भुसावळ पश्चिम रेल्वेमार्गावर राज्य सरकारने उड्डाणपूल उभारला आहे. राष्टÑीय महामार्ग क्रमांक एकवर असलेल्या या पुलावरून गुजरात, राजस्थान, तामिळनाडू या राज्यांची हजारो वाहने ये-जा करतात. तसेच दोंडाईचा परिसरातील हजारो वाहने रोज या पुलावरून ये जा करतात. अवजड वाहने व इतर वाहने यांची वर्दळ नेहमीच सुरू असते. रेती ट्रक सह ट्रॉलर, मल्टी एक्सल व इतर वाहने भरधाव वेगाने उड्डाण पुलावरून जातात. पुलाच्या बांधकामाच्या खर्च वसुलीसाठी टोलनाका कार्यरत होता. राज्य सरकारने टोलनाका बंद केल्याने तेथील इमारत बेवारस ठरली आहे. पुलाच्या देखभालीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे.शहरातील या पुलाच्या कठड्यांची दुरवस्था झाली आहे. पुलाची उंची रुळापासून सुमारे ४० फुट आहे. पुलाचे कठडे तब्बल चार ठिकाणी तुटले असून त्यांचे नुकसान झाले. सिमेंट खांबावर लोखंडी पोकळ पाईप आडवे लावून हे कठडे तयार केले आहेत. पुलाचे उभे सिमेंट खांब कोसळले असून लोखंडी पाईपही निखळून खाली पडले आहेत. कठडे ब्रेक झाल्याने अपघाताची दाट शक्यता वाढली आहे. कठडे चार ठिकाणी तुटल्याने बराच भाग मोकळा झाला आहे. शुक्रवारी पुलावरून दुचाकीस्वार खाली कोसळल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कठडा तुटलेल्या ठिकाणी पुलावरून खाली कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. काही महिन्यांपूर्वी याच ठिकाणी बसचा अपघात झाला होता. परंतु लोखंडी पाईपमुळे बस खाली कोसळण्यापासून वाचली होती. अपघातासह जीवितहानी टळली होती . कठडे तुटल्याने मोठा अपघात होऊ शकतो.अपघात होऊ नये म्हणून पुलाचा कठड्याची दुरुस्ती तात्काळ करावी अशी मागणी आहे .गतिरोधकाअभावी अपघाताची शक्यता वाढीलासार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावरील सर्वच गतिरोधक आता काढून टाकली आहेत. या पूलावरून दोडाईचाकडे येणारी वाहने उतारावरून भरधाव वेगाने खाली येतात. येथे तसेच नंदुरबार चौफुलीजवळही गतिरोधक नाहीत. अपघात टाळण्यासाठी ते गरजेचे असूनही तेथे शास्त्रीयदृष्ट्या योग्य उंचीचा गतिरोधक नाही. त्या मुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
लोखंडी कठडे तुटल्याने अपघाताचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 12:18 PM