धुळे : भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ रविवारी धुळे दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी पत्रकारांशी पत्रकार परिषद घेऊन संवाद साधला. महिला मुख्यमंत्री होण्यावर चित्रा वाघ यांनी आपले मत व्यक्त करताना मुख्यमंत्री पदावर महिला बसली तर आम्हाला आनंदच आहे, पण महिला मुख्यमंत्री झाल्यानंतर आमचे सगळे प्रश्न सुटतील, या मताशी मी सहमत नाही. स्त्री आणि पुरुष म्हणून नव्हे तर व्यक्ती म्हणून आम्ही आहोत, त्यामुळे जी व्यक्ती ज्या मुख्यमंत्रीपदावरती बसेल, मंत्रीपद सांभाळल्यानंतर त्यांनी सगळ्या जबाबदारीने काम केलं पाहिजे, सगळ्या घटकांना न्याय दिला पाहिजे, आमचं हेच मत आहे, असे चित्रा वाघ म्हणाल्या.
कर्नाटकची महाराष्ट्रात देखील घुसखोरी होत असून नागपूर येथील विमानतळावर लागलेल्या बॅनर वरून संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा देखील चित्रा वाघ यांनी समाचार घेतला आहे. संजय राऊत हे अंतर्यामी आहेत ते काहीही बोलू शकतात, आमच्यासाठी आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांचे स्टेटमेंट महत्त्वाचे असून टाचणी भर देखील जागा कुणालाही देणार नाही, यासाठी शिंदे व फडणवीसांचे सक्षम सरकार आहे, ज्यांना जे बोलायचं आहे ते त्यांना बोलू द्या, महाराष्ट्राची काळजी करण्यासाठी महाराष्ट्राच सरकार खंबीर आहे, असे चित्रा वाघ यांनी सांगितले.
प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मावरून केलेल्या विधानावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चित्रा वाघ यांनी मी प्रवासात असल्यामुळे कोण काय बोलले आहे, याची मला माहिती नाही आणि त्यामुळे ज्या गोष्टीची माहिती नाही. त्यावर बोलणं उचित नसल्याचे म्हणत या प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न चित्रा वाघ यांनी केला आहे. तसेच, मी हे पूर्ण ऐकले नसून परंतु प्रसाद लाड यांनी त्यामागची भूमिका देखील स्पष्टपणे बोलून दाखविले असल्याचे मत चित्रा वाघ यांनी व्यक्त केले आहे. बराच वेळा केलेल्या विधानाचा विपर्यास केला जातो असे देखील चित्रा वाघ यांनी बोलताना स्पष्ट केले आहे.
आगामी मंत्रिमंडळ विस्तारत महिलांना स्थान मिळेल का? यावर बोलतांना चित्रा वाघ यांनी आपले मत व्यक्त केले आहे. एक नको तर मी तर म्हणते दोन तीन महिला ह्या मंत्री मंडळात मंत्री व्हायला पाहिजेत आणि येणाऱ्या दिवसांमध्ये निश्चितपणे तुम्हाला मंत्रिमंडळामध्ये चांगल्या सक्षम अशा आमच्या आमदार आहेत. त्या मंत्री म्हणून काम करताना दिसतील, असे चित्रा वाघ यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आगामी मुख्यमंत्री महिला असेल, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा देखील चित्रा वाघ यांनी धुळ्यात समाचार घेतला.
महिला मुख्यमंत्री करण्याचा मुद्दा ज्यांनी उपस्थित केला. त्यांनी मुख्यमंत्री पदाची आपली हाऊस फिटली. त्यानंतर त्यांना आता महिला मुख्यमंत्री करण्याची आठवण आली आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाना साधला आहे. तसेच, सरकार पडणार व मध्यवर्ती निवडणुका लागणार हे वारंवार भविष्य वर्तवणाऱ्या विरोधकांवर टीका करताना अजित पवार यांनी काँग्रेस व शिवसेनेच्या नेत्यांची ट्युशन घ्यावी असे चित्रा वाघ म्हणाल्या. अजित पवार यांनी यापूर्वीच कुठल्याही मध्यवर्ती निवडणुका लागणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर देखील, अशा प्रकारचे वक्तव्य केले जात असल्यामुळे विरोधकांची अजित पवार यांनी असे वक्तव्य करणाऱ्यांची ट्युशन घ्यावी असे म्हणत, सरकार पडणार व मध्यवर्ती निवडणुका लागणार असे म्हणणाऱ्यांचा समाचार घेतला आहे.