सचिन देवधुळे : एसटी महामंडळाच्या धुळे विभागातर्फे अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी चालक - वाहक पदासाठी निःशुल्क प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिष्णां नंतर पात्र उमेदवारांना सेवेत सामावून घेण्यात येणार आहे. मात्र, या निःशुल्क प्रशिक्षणासाठी व त्या नंतर नोकरीसाठी सबंधित जमातीच्या उमेदवारांना काही बाहेरील दलाल मंडळी आर्थिक आमिष मागून एसटी महामंडळात नोकरीचे आमिष दाखवित असल्याच्या तक्रारी विभाग नियंत्रक यांच्याकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे अशा आमिशाला बळी न पडण्याचे आवाहन एसटी महामंडळ प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
एसटी महामंडळाने पहिल्यांदाच अनुसूचित जमातीच्या धुळे, नंदुरबार, जळगाव व नाशिक या जिल्हातील तरुणांसाठी अशा प्रकारे भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांचे सहा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर, यात जे उमेदवार अंतिम सर्व परीक्षा यशस्वी होतील, त्यांना एसटी महामंडळातील रिक्त जागांनुसार व त्या वेळेच्या परिस्थिती नुसार सेवेत सामावून घेण्यात येणार आहे. मात्र, असे असताना बाहेरील काही दलाल या अनुसूचित जमातीच्या युवकांशी संपर्क साधून त्यांना एसटी महामंडळात नोकरीचे आमिष दाखवित आहेत.
काही एसटी कर्मचाऱ्यांमार्फत सबंधित तरुणांनी हा प्रकार धुळे विभागाचे विभाग नियंत्रक विजय गिते यांच्या कानी घातला आहे. त्यामुळे गीते यांनी संबधित जमातीच्या उमेदवारांनी एसटी भरती प्रक्रियेत कुठलेही गैरप्रकार चालत नाही. प्रशिक्षणासाठी पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होणार आहे. त्यामुळे तरुणांनी कुठल्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन विजय गिते यांनी केले आहे.
एसटी महामंडळातर्फे धुळे विभागा मार्फत अनुसूचित जमातीच्या युवकांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण देऊन, यात यशस्वी होणाऱ्या युवकांना रिक्त जागेनुसार सेवेत घेण्यात येणार आहे. मात्र, यात काही दलाल मंडळी या अनुसूचित जमातीच्या युवकांशी संपर्क साधून, त्यांच्याकडे आर्थिक आमिष मागून, एसटी महामंडळात नोकरी लावून देण्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. त्यामुळे तरुणांनी अशा कुठल्याही आमिषाला बळी पडू नये, प्रशिक्षणाची व त्या नंतर सेवेत घेण्याची प्रक्रिया पारदर्शक होणार आहे. यात कोणाचीही वशिलेबाजी ना दलाली चालणार नाही.
विजय गिते, विभाग नियंत्रक, धुळे.