लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : दोंडाईचा येथील पाच वर्षीय मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी सीआयडी चौकशी करून संबंधित पीडित मुलीस न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी जिल्हा सर्व समाज समावेशतर्फे गुरुवारी जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या मागणीसाठी गुरुवारी जिल्हा सर्व समाज समावेशकतर्फे गुरुवारी महा मूकमोर्चा काढण्यात आला होता. या मूकमोर्चाची सांगता जिजामाता शाळा येथे झाली. त्यानंतर तरुणींच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे, की दोंडाईचा येथे ८ फेब्रुवारीला नूतन विद्यालयाच्या परिसरात पाच वर्षाच्या बालिकेवर नराधमाने अत्याचा केला. ही घटना पीडित मुलीच्या शारीरिक तपासणीनंतर उजेडात आली. यासंदर्भात पीडित मुलीच्या आई, वडीलांनी संस्थाचालक, मुख्याध्यापक व इतर कर्मचाºयांना जाब विचारला असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली. माहिती देण्यास टाळाटाळ केली. पीडितेच्या कुटुंबीयांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या प्रकरणी काही लोकांची भूमिका ही संशायास्पद दिसून येत आहे. त्यामुळेच या घटनेचा गुन्हा दाखल होण्यास उशीर झाला. त्यामुळे संशयित आरोपीला पळून जाण्यासाठी वेळ मिळाला. आता याप्रकरणी मुख्य आरोपीस अटक करण्यात आली असून तपास अधिकारी व यंत्रणा दबावाखाली काम करीत आहे, हे स्पष्ट होते. यावेळी साक्षी मोरे, रोशनी चौधरी, सेजल बैसाणे, सिद्धी करनकाळ, हिमाणी वाघ, भाविका चौधरी, हर्षदा चौधरी, सपना चौधरी, रूपाली चौधरी, इशा बेडसे, साक्षी चौधरी, किरण पाटील, प्रणाली चौधरी, सुरेखा नांद्रे आदी उपस्थित होत्या. पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह दोंडाईचा बालिका अत्याचार प्रकरणाला आज एक महिना पूर्ण होत आहे. आतापर्यंत मुख्य आरोपीला अटक झाली असून सहआरोपीला पोलिसांनी अद्याप अटक केलेली नाही. परिरामी, पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून याप्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवावा, अशी मागणी निवेदनात नमूद करण्यात आली आहे.
१५ मार्चनंतर तीव्र आंदोलन
दरम्यान, निवेदनातील मागण्या त्वरित निकाली न निघाल्यास १५ मार्चनंतर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाला देण्यात आला आहे.