लोकमत आॅनलाईनधुळे : साक्री तालुक्यातील कासारे येथे कांद्यास भाव मिळावा, यासाठी शेतक-यांनी गुरूवारी खासदार डॉ.हिना गावित यांच्या उपस्थितीत होणा-या गॅसवाटप कार्यक्रमापूर्वीच रस्त्यावर कांदा फेकून राज्य व केंद्र सरकारांचा निषेध केला़ ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत साक्री तालुक्यातील कासारे गावात खासदार डॉ़ हिना गावित यांच्या उपस्थितीत गुरूवारी कार्यक्रम होणार आहे. परंतु कांदा पिकाला भाव मिळत नसल्याने कासारे गावातील शेतकरी आक्रमक झाले आहेत़ डॉ़ हिना गावित यांच्या उपस्थितीत कार्यक्रम असल्याने केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी शेतक-यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी कांदा फेकून निषेध व्यक्त केला आहे़ त्याचठिकाणी निदर्शने करण्यासाठी शेतक-यांनी गर्दी केल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे़ परिणामी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़ पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे़ अद्याप खासदार आलेल्या नसल्या तरी कासारे गावात मात्र तणावाची स्थिती निर्माण झाली आहे़