कसारे : येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी फातेमा बलदारखा पठाण यांची एका मताने गुरुवारी दुपारी दोन वाजता विशेष सभेत निवड झाली.मावळते उपसरपंच सचिन नवल देसले यांनी कार्यकाळ संपल्यामुळे १५ डिसेंबरला पदाचा राजीनामा दिला होता. सदर राजीनामा २२ जानेवारीला मंजूर झाला होता. त्यानुसार उपसरपंच निवडीचा कार्यक्रम लावण्यात आला. गुरुवार २८ रोजी सकाळी १० ते १२ पर्यंत अर्ज मागविण्यात आले असता फातेमा बलदारखा पठाण व दिनेश दिलीपराव खैरनार यांचे दोन अर्ज दाखल झाले. दुपारी २ वाजता लोकनियुक्त सरपंच विशाल अनंतराव देसले यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा बोलावण्यात आली. त्या प्रसंगी मतदान पध्दतीने निवडणूक झाली. त्यात फातेमा बलदारखा पठाण यांना ९ मते व दिनेश खैरनार यांना ८ मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी अनिल तोरवणे यांनी उपसरपंचपदी एका मताधिकक्याने फातेमा पठाण यांची घोषणा केली. या प्रसंगी सरपंच देसले यांच्यासह मावळते उपसरपंच सचिन देसले व सर्व १८ सदस्य उपस्थित होते. यावेळी दिनेश खैरनार यांना माहेश्वरी सचिन देसले तर फातेमाबी पठाण यांना सचिन नवल देसले हे सूचक होते. निवडणूक सभेचे कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी अनिल तोरवणे, लिपिक भटू ठाकरे, बाळा देसले, आधार देसले यांनी पाहिले. फातेमा पठाण यांच्या निवडीसाठी जिल्हा परिषद सदस्य उत्तमराव देसले, दिलीप काकुस्ते, माजी सरपंच सुभाष देसले, हाजी बलदार पठाण व कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.
कासारे सरपंचपदी फातेमा पठाण यांची १ मताने निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 10:15 PM