औरंगाबाद : प्रशासकीय पातळीवर खरीप हंगामाची तयारी सुरू झाली आहे. यंदा जिल्ह्यातून ३ लाख मेट्रिक टन रासायनिक खताची मागणी आली आहे. सरकारने २ लाख २७ हजार मेट्रिक टन खताला मंजुरी दिली आहे. त्यातील २५ हजार मेट्रिक टन रासायनिक खत उपलब्ध झाले आहे.
पुढील महिन्यात पावसाळ्याला सुरुवात होत आहे. त्यादृष्टीने रासायनिक खत पुरवठ्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यात रासायनिक खताचा सरासरी वापर १८७६८२ मे. टन एवढा आहे. रब्बी हंगामातील ३७०३३ मे. टन खताचा साठा शिल्लक आहे. जिल्हा कृषी विभागाने यावर्षी रासायनिक खताची किती आवश्यकता आहे, याची तालुकानिहाय आकडेवारी मागविली होती. त्यानुसार ३०४७४० मे. टन खताची मागणी नोंदविली होती.
सरकारने जिल्ह्यातील रासायनिक खताचा सरासरी वापर लक्षात घेऊन खरीप हंगामासाठी २२७३०० मे. टन रासायनिक खत पुरवठा करण्यास मंजुरी दिली आहे. त्यातील २५२६० मे. टन खताचा पुरवठाही झाला आहे. जिल्ह्यात सध्या ६२२९३ मे. टन रासायनिक खत उपलब्ध आहे. शासनाने मंजूर केलेल्यामध्ये युरिया ९९१९० मे. टन, डीएपी १७७९०, एसएसपी/टीएसपी २६७७९, एमओपी १२३०१, एकूण संयुक्त खते ७१२४० मे. टन एवढी आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मागील ४ वर्षांपासून खताचा तुटवडा जाणवला नाही. यंदाही खरीप हंगामात रासायनिक खत मुबलक प्रमाणात उपलब्ध राहील, असे नियोजन करण्यात आले आहे.