भिका पाटील -शिंदखेडा(धुळे) : तालुक्यातील एका गावातून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास दादरच्या शेतात एका गोणपाटात मृतदेह आढळून आला. हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय आहे. याप्रकरणी शिंदखेडा पोलिस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
शिंदखेडा तालुक्यातील एका गावात नववीत शिकणारी १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी ५ फेब्रुवारी रोजी बेपत्ता झाली होती. याप्रकरणी तिच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून ६ रोजी शिंदखेडा पोलिस स्टेशनला अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, त्याच गावात एका शेतात रविवारी दुपारी मजूर दादर कापणीचे काम करीत असताना त्यांना शेतात पडलेल्या गोणपाटातून उग्र वास येऊ लागला. मजुरांनी गावात धाव घेत, पोलिस पाटलांना घटनेची माहिती दिली.
पोलिस पाटलाने शिंदखेडा पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक दीपक पाटील, उपनिरीक्षक मिलिंद पवार, एकलाख पठाण, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. कुंदन पवार घटनास्थळी पोहोचले. सर्वांच्या उपस्थितीत गोणपाट फाडून पाहिले असता, त्यात अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आला. हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय असून, पोलिस त्या दिशेने तपास करीत आहेत. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांनीही भेट दिली. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. घटनास्थळी ग्रामस्थांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शिंदखेडा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला नव्हता.