धुळे : शिंदखेडा येथे कोविड सेंटर सुरू करण्यात आले असून डाॅक्टरांसह आवश्यक आरोग्य कर्मचारी उपलब्ध करून देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ऑक्सिजन तसेच पूर्णवेळ रुग्णवाहिका उपलब्ध आहे, अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शाम सनेर यांनी दिली. येथील कोविड सेंटर कार्यान्वित करण्यासाठी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता.
शिंदखेड्यात कोविड सेंटर सुरू करण्याबाबत गेल्या एक महिन्यापासून काँग्रेस पक्षाकडून सातत्याने मागणी करण्यात येत होती. याबाबत जिल्हाधिकारी संजय यादव यांची चार दिवसांपूर्वी प्रत्यक्ष भेट घेऊन शिंदखेडा शहर व तालुक्याच्या परिस्थितीची माहिती देण्यात आली. त्यानंतर त्यांनी कोविड सेंटर तत्काळ सुरू करण्याचे निर्देश उपविभागीय अधिकारी विक्रम बांदल यांना दिले. यासंदर्भात गुरुवारी शिंदखेडा तहसील कार्यालयात बैठक झाली. या बैठकीला उपविभागीय अधिकारी विक्रम बांदल, तहसीलदार सुनील सैंदाणे, पोलीस निरीक्षक सुनील भाबड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत देशमुख, शिंदखेडा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शाम सनेर, शिंदखेडा नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते सुनील चौधरी, नगरसेवक दीपक आहिरे, उदय देसले, चंद्रकांत सोनवणे, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश पाटील आदी उपस्थित होते. या बैठकीत शिंदखेडा येथील कोविड सेंटर गतिमान करण्यात यश आले आहे. डॉक्टर उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला. ऑक्सिजन उपलब्ध आहे. पूर्णवेळ ॲम्बुलन्स आहे.
या बैठकीत विरोधी पक्षनेते सुनील चौधरी यांनी १८ ते ४५ वर्षे वयोगटांसाठीचे लसीकरण एकत्रित एकाच ठिकाणी करण्यात येऊ नये. वाॅर्डनिहाय लसीकरण केंद्र सुरू करावे, या मागणीकडे उपविभागीय अधिकारी यांचे लक्ष वेधले. ही मागणी त्यांनी मान्य केली. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शाम सनेर यांनी कोविड सेंटरमध्ये तत्काळ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात यावी तथा दोंडाईचा शहरातदेखील चार ते पाच ठिकाणी लसीकरणाचे केंद्र सुरू करण्याची मागणी केली. या मागणीबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांनी सकारात्मकता दर्शविली आहे. ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांची रिक्त पदे भरली जात नसल्याने सर्वांनीच संतप्त भावना व्यक्त केल्या. रिक्त पदे त्वरित भरण्याची मागणी केली.