धुळे : भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी गांधीजींसोबत काँग्रेसच्या नेत्यांनी बलिदान दिले, मात्र आज तेच स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. त्यामुळे देश पुन्हा पारतंत्र्यात जाण्याची भिती निर्माण झाली आहे़ म्हणून काँग्रेस आणि काँग्रेसची विचारधारा जनमानसात पोहचवून स्वातंत्र्याची लढाई पुन्हा लढायची आहे. असे आवाहन काँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी मंत्री मुझफ्फर हुसेन यांनी केले. दरम्यान, आमदार कुणाल पाटील यांना राज्यात महत्वाची जबाबदारी दिली जाईल. त्यांनी आता खान्देशात काँग्रेस वाढून उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करायचे आहे, असेही प्रतिपादन कार्याध्यक्ष हुसेन यांनी केले.महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन हे धुळे जिल्हा दौऱ्यावर आले होते़ त्यांच्या उपस्थितीत धुळे तालुका काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकिच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री रोहिदास पाटील होते. बैठकीच्या सुरुवातीला काँग्रेस खंदे कार्यकर्ते आणि जवाहर सुतगिरणीचे संचालक स्व. बापू नेरकर यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांनी सांगितले कि, धुळे आणि नंदुरबार जिल्हा हा काँग्रेस विचारांचा आहे मात्र वरीष्ठांनी कॉग्रेसचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांमागे शक्ती उभी करावी़ राज्यात आमदार कुणाल पाटील यांना स्थान दिले तर भविष्यात खान्देशात काँग्रेसचे सर्वाधिक आमदार निवडून येतील.धुळे जिल्ह्यात काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला गतवैभव प्राप्त करुन देण्याचा निर्धार आमदार कुणाल पाटील यांनी व्यक्त केला़यावेळी युवराज करनकाळ, गुलाबराव कोतेकर, डॉ.दरबारसिंग गिरासे, गणेश गर्दे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते़
कुणाल पाटलांना देणार महत्वाची जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 9:53 PM