धुळे : ऊसतोड वाहतूक करण्यासाठी मजूर पुरविण्याचे आश्वासन देऊन १८ लाख रुपये घेतले. आर्थिक व्यवहार ३० जून २०२३ रोजी करूनदेखील आजपावेतो कोणतेही मजूर पुरविले नाहीत. पाठपुरावा करूनदेखील काही उपयोग झाला नाही. ही घटना साक्री तालुक्यातील जांभोरा शिवारात घडली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सोलापूर येथील व्यापाऱ्याने निजामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
ऊसतोड ठेकेदार बलभीम हनुमंत गव्हाणे (वय ३३, रा. बादलकोट, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, ऊसतोडीसाठी मजूर हवे असल्याने साक्री तालुक्यातील जांभोरा शिवारात संपर्क साधण्यात आला. याठिकाणी दाेन जणांशी संवाद साधला. मजूर पुरविण्याचे त्यांच्याकडून आश्वासन देण्यात आले होते. त्याबदल्यात १८ लाखांचा व्यवहार करण्यात आला.
मजूर पुरविण्याच्या अगोदरच पैसे घेण्यात आले. हा व्यवहार ३० जून २०२३ रोजी झाला. ३१ ऑक्टोबर येऊनदेखील ऊसतोडीसाठी मजूर आले नाहीत की, दिलेले १८ लाख रुपये परत केले नाहीत. यासाठी पाठपुरावा करण्यात आला. पण, त्याचा काही उपयोग झाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गव्हाणे यांनी निजामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, साक्री तालुक्यातील जांभोरा येथील दोन जणांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आला. घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक विशाल पाटील करीत आहेत.