धुळे : शिंदखेडा तालुक्यातील अक्कडसे येथील १९ वर्षीय तरुण तापी नदीपात्रातील वाळू उपशाच्या खड्ड्यात पडून बेपत्ता झाल्याची घटना घडली़ या घटनेनंतर ग्रामस्थ व वाळू ठेकेदार गोरख पाटील यांच्यात वाद झाला़ याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़सतीश छोटू सैंदाणे (१९) हा तरुण रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास उप्परपिंड येथे चावदसनिमित्त कुळदेवता असलेल्या मनुदेवी मंदिरात दर्शनासाठी तापी नदीपात्रातून जात होता़ त्या वेळी बेसुमार वाळू उपशामुळे निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे त्याला पाण्याचा अंदाज आला नाही व खड्ड्यात पडल्याने बेपत्ता झाला़ याबाबत सतीशच्या घरी माहिती देण्यात आल्यानंतर त्याचे कुटुंबीय व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली़ कुटुंबीयांना त्याची चप्पल पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून आले़ वाळू उपशामुळे पडलेल्या खड्ड्यात तो पडल्याने संतप्त ग्रामस्थांनी थेट नदी पलीकडे असलेल्या उप्परपिंड येथील वाळू ठिय्यांवर हल्ला करून साहित्याची तोडफोड केली़ त्यामुळे तणाव निर्माण झाला होता़ वाळू ठिय्यांवरील ५ ते ६ जण ग्रामस्थांवर धावून गेले़ ठेकेदाराने तलवार काढली़ यामुळे तणाव आणखी वाढला़ या घटनेची माहिती मिळताच शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्ता पवार, सहायक पोलीस निरीक्षक ए़ए़पटेल यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले़ पोलिसांनी मध्यस्थी करीत वाद मिटवला व तलवार जप्त केली़ तसेच गोरख पाटील नामक वाळू ठेकेदारावर कारवाईचे आश्वासन दिले़ या वेळी संपूर्ण गाव नदीपात्रात गोळा झाले होते़ सतीश हा आईवडिलांचा एकुलता मुलगा असून त्याला दोन बहिणी आहेत़ त्याचे वडील दोंडाईचा येथील न्यायालयात खासगी लिपिक म्हणून काम करतात़ दरम्यान, या घटनेनंतर सतीशच्या मोबाइलचे लोकेशन खड्ड्याजवळ असल्याचे दिसून आल्याचे पोलिसांनी सांगितले़ पोलीस रात्री उशिरापर्यंत ठाण मांडूनरात्री उशिरापर्यन्त संदीपला शोधण्याचे कार्य सुरू होते. घटनास्थळी अक्कडसे ग्रामस्थ, शिंदखेडा पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक वसंत सोनोने, पीएसआय स्वप्नील राजपूत, योगीराज जाधव, प्रकाश पोतदार हे ठाण मांडून होते. यासंदर्भात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.
वाळू ठेकेदार-ग्रामस्थांमध्ये वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2017 12:22 AM