धुळे : मित्रांच्या मदतीने कटकारस्थान रचून मोबाईल आणि दुचाकी घेऊन पोबारा करणाऱ्या दोघांसह तिघांना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. घटनेनंतर अवघ्या काही तासांत प्रकरणाचा छडा लावण्यात यश आले. तिघांना अटक करण्यात आली असून, १ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चितोड रोड भागातील विलास बबनराव खताळ हा मित्रासोबत (एमएच १८ बीडब्ल्यू ३६९५) क्रमांकाच्या दुचाकीने ६ नोव्हेंबर रोजी महामार्गावरील हॉटेल नालंदा हॉटेलजवळील सर्व्हिस रोडवरून जात असताना मित्राला लघुशंका लागल्याने खताळ हे अंधारात थांबले होते. त्याचवेळेस दोन जणांनी अंधाराचा फायदा घेऊन त्याच्याकडील दुचाकी आणि मोबाईल घेऊन पोबारा केला. याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. चाळीसगाव रोड पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखा यांचा संयुक्त तपास सुरू असतानाच एकवीरा देवी मंदिर परिसरातून मोईन हुसन्नोद्दीन शेख (वय २४) याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने फैसल शेख जाफर (मेहतर) (वय २३, रा. काझी प्लॉट, वडजाई रोड, धुळे) आणि सैय्यद उमेर सैय्यद जाफर (वय २३, रा. काझी प्लॉट, वडजाई रोड, धुळे) या दोघांची नावे सांगून कटकारस्थान रचून नियोजन करून ही लूट केली असल्याची पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. चाळीसगाव चौफुलीजवळ लपवून ठेवलेली दुचाकी पोलिसांना काढून दिली. तसेच माेबाईल आणि अन्य दुचाकी असा एकूण १ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे. तिघांना अटक केली असून, चाळीसगाव रोड पोलिसांच्या हवाली करण्यात आले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दत्ता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, सहायक पोलिस उपनिरीक्षक संजय पाटील, कर्मचारी संदीप सरग, हेमंत बोरसे, योगेश चव्हाण, संदीप पाटील, प्रल्हाद वाघ, तुषार सूर्यवंशी यांनी कारवाई केली.