धुळे : काही दिवसांपूर्वी वधारलेल्या भाजीपाला आणि फळभाज्यांच्या भावात मोठी घसरण झाली आहे. मेथी, शेपू, कोथंबीर, टमाटा, पालक, चिल, काकडी, दोडका, गिलके या भाज्यांना बाजारात कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. भाज्यांना पिकविण्यासाठी केलेला खर्च निघत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.पंधरा दिवसांपूर्वी कोथिंबीर १०० ते १५० रुपये जुडी, मेथी ५० ते ६० रुपये जुडी तर शेपू ४० ते ५० रुपये जुडीने बाजारात किरकोळ आणि घाऊक विकली जात होती. परंतु गेल्या काही दिवसात भाजीपाल्याचे गगनाला भिडलेले भाव अचानक खाली घसरले आहेत. बाजारात भाज्यांचे ढीग पडलेले आहे तर अनेक शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणावयाचा खर्च सुद्धा वसूल होत नसल्याने भाज्या शेतात पडून आहे. अनेक शेतकºयांनी एक दोन एकर किंवा त्यापेक्षा जास्त जमिनीत भाज्यांची लागवड केली आहे. यंदा प्रथमच कांद्याचे रोपे पावसाने खराब झाल्याने आणि नवीन रोपे लागवडीसाठी किमान दोन महिने कालावधी असल्याने त्या जमिनीत काय करावे म्हणून दीड ते दोन महिन्यांचे सोपे आणि लवकर येणारे पीक म्हणून भाज्यांची लागवड केली मात्र भाज्यांची विक्रमी आवक झाली. त्यामुळे दर कोसळले असल्याचे सांगण्यात येत आहे़
पालेभाज्यांना बाजारात कवडीमोल किंमत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2020 10:58 PM