लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : स्वराज्यात प्रेम, समता, बंधूभाव आणि न्यायाचे अधिराज्य होते. सर्व जाती, धर्माच्या रयतेचे सुख, दु:खाची चिंता व आपुलकी असणारे छत्रपती शिवाजी महाराज हे श्रीमंत योगी व प्रगल्भ बुद्धीमत्तेचे होते. त्यांच्या काळात जनता गुण्यागोविंदाने नांदत होती. त्याकाळी एकही जातीय दंगल झाल्याची नोंद नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. एम.एस. पाटील यांनी येथे केले. सर्वधर्म संघातर्फे रविवारी बर्वे कन्या छात्रालयाच्या सभागृहात व्याख्यान झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जैन अमोल वाचनालयाचे प्रा. प्रेमसुख छाजेड होते. प्रारंभी सर्वधर्म प्रार्थना सादर करण्यात आली. प्रास्ताविक शंकर पवार यांनी केले. यावेळी त्यांनी काव्य सादर केले. यानंतर शाहीर भटू गिरमकर यांनी ‘शिवबाचा जन्म सोहळा’ हा पोवाडा सादर करीत येथे उपस्थित मान्यवरांना मंत्रमुग्ध केले. यावेळी झुंबरलाल शर्मा, दलित मित्र ज्योत्स्राताई खैरनार, शेख हुसेन गुरूजी, डॉ. विजयचंद्र जाधव, गणेश पाठक, विश्वास भट, सुरेश लोंढे, प्रा. प्रभा निकुंभे, रवींद्र अन्सारी, सुनीता बोरसे, गुलाबराव मोरे, शाहीर माणिक शिंदे, रंजना नेवे, रुस्तम कुरेशी, अंजली पाटील, महेंद्र बैसाणे आदी उपस्थित होते. याप्रसंगी कविवर्य अमृतसागर यांच्या ‘एक शिवा अन् एक भीमाईचा भीमा’ या बोधप्रद गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. सूत्रसंचालन दत्तात्रय कल्याणकर यांनी केले. आभार श्रीकृष्ण बेडसे यांनी मानले.
सर्वधर्म संघातर्फे धुळ्यातील बर्वे छात्रालयात व्याख्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 11:33 AM
अॅड.एम.एस. पाटील : छत्रपती शिवरायांना सर्व जाती-धर्माविषयी आपुलकी
ठळक मुद्देअॅड. एम. एस. पाटील पुढे म्हणाले, की राजा कसा हवा? याचे सर्वोत्कृष्ट आदर्श उदाहरण शिवाजी राजे यांचे आहे. ते शिस्तप्रिय होते. तसेच त्यांचा सर्वांवर वचक होता. शिवराय हे जातपात मानत नव्हते.त्यांच्या काळात आरमार आणि तोफखान्याचे प्रमुख मुस्लीम समाजाचे होते; तर हेर विभागाचे प्रमुख दलित समाजाचे होते. यावेळी डॉ. विजयचंद्र जाधव म्हणाले, की कल्याणकारी राज्याची संकल्पना मांडणारे जाणता राजा म्हणजे जाज्ज्वल्य देशभक्ती, सौजन्यपूर्ती व स्वधर्मासह अन्य धर्मीयांवर सतत प्रेम करणारे ते राजे होते.