योगेश हिरे म्हसदी : अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास साक्री तालुक्यातील वसमार- धमनार रस्त्यावर घडली आहे. वाहनाची भीषण धडक बसल्याने बिबट्याचा प्रचंड रक्तस्राव होऊन जागीच गतप्राण झाला.
गेल्या काही वर्षांपासून या परिसरात बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. शनिवारी रात्री शिकारीच्या शोधात असलेला बिबट्या गाव शिवारात येताना वसमार- धमनार रस्त्यावर अज्ञात वाहनाने बिबट्याला जोराने धडक दिली. या मध्ये बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे या रस्त्यावर वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार होण्याची गेल्या वर्षीभरात दुसरी घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन वन विभागा च्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली. यानंतर वनविभागाचे पिंपळनेर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी डी.आर.अडकीने यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल डी.पी.पगारे, एल आर वाघ व वनकर्मचारी रमेश बच्छाव यांनी घटना स्थळी येऊन पंचनामा केला.
बिबट्याच्या मृत देहाचे शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले. नर जातीचा हा बिबट्या असून, वन विभाागाचे अधिकारी वाहन धरकाचा शोध घेत आहेत. घटनास्थळी वसमारचे सरपंच समाधान येळीस, उपसरपंच भटू नेरे, सुशील नेरे, मच्छिंद्र नेरे ,धमनारचे सरपंच जितेंद्र खैरनार,पोलीस पाटील मोहन सोनवणे, दीपक बच्छाव,संदीप संदीप खैरनार डॉ,मयूर चित्ते, आदी घटनास्थळी उपस्थित होते.