लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : अक्कलपाडा मध्यम प्रकल्पाच्या पाणी आरक्षणाची एकूण थकबाकी ९७ लाख ९१ हजार इतकी झाली आहे. पैकी ५० टक्के रक्कम अर्थात ४५ लाख ९६ हजार रुपये तातडीने भरावे, असे आदेश पाटबंधारे विभागाने जिल्हा परिषदेला दिले आहेत. त्यापार्श्वभूमीवर अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून ज्या ३३ गावांसाठी पाणी आरक्षित आहे. अशा गावातील ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे बिगर सिंचन पाणीपट्टी वसुलीसाठी पत्र दिले जाणार आहे.अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून ३३ गावांसाठी पाणी आरक्षित आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे संबंधित गावाच्या ग्रामपंचायतीकडून बिगर सिंचन पाणीपट्टी वसूल करून ही रक्कम पाटबंधारे विभागाला दिली जाते. त्यानुसार संबंधित ३३ गावांना अक्कलपाडा धरणातून पाणी हे सोडले जाते. परंतु, गेल्यावर्षी व यंदा अक्कलपाडा धरणातून पाणी सोडण्यात आल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतींनी पाणीपट्टी अद्याप जमा केलेली नसल्याची बाब समोर आली आहे. परिणामी, तब्बल ९७ लाख ९१ हजार इतकी थकबाकी थकली आहे.थकबाकी भरल्याशिवाय आवर्तन सोडणार नाही नुकतेच धुळे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता के. टी. सूर्यवंशी यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराजन यांना पत्र दिले आहे. एकूण थकबाकी पैकी ५० टक्के रक्कम तातडीने जमा करण्याचे पत्राद्वारे सूचित करण्यात आले आहे. त्यानुसार ४५ लाख ९६ हजार पाटबंधारे विभागाकडे जमा करावे लागणार आहे. ही रक्कम जमा होत नाही; तोपर्यंत अक्कलपाडा धरणातून आवर्तन सोडणार नाही, असा इशारा पाटबंधारे विभागातर्फे देण्यात आला आहे. गेल्यावर्षी दहा लाख भरले सन २०१६-२०१७ अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून पांझरा नदीकाठावरील धुळे, शिंदखेडा, अमळनेर (जि. जळगाव) तालुक्यातील गावांना २०० दलघफु पाणी आरक्षित केले होते. प्रत्यक्ष अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून सन २०१६-२०१७ या वर्षात दोन आवर्तनासाठी ४६२ दलघफू इतके पाणी सोडण्यात आले. तसेच पाणी आरक्षणाची पाणीपट्टी ही ४१ लाख ४५ हजार इतकी झाली होती. मात्र, ३१ मार्च २०१७ पर्यंत १० लाखाची थकबाकी जमा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. परंतु, २०१७-२०१८ या कालावधिसाठी जिल्हाधिकाºयांनी ४६२ दलघफू पाणी आरक्षित केले असून पहिल्या आवर्तनास २७६ दलघफू इतके पाणी सोडण्यात आले. या पाण्याची आकारणी २४ लाख ७६ हजार इतकी आहे. तसेच गेल्या वर्षाची ३१ लाख ७० हजार व चालू आकारणी ६६ लाख २१ हजार अशी एकूण ९७ लाख ९१ हजार इतकी पाणीपट्टी थकीत झाली आहे.
या गावांसाठी आहे पाणी आरक्षितनवे भदाणे, जुने भदाणे, नेर, अकलाड, मोराणे प्र नेर, खेडे, वार, कुंडाणे वार, मोराणे प्र. ल., वलवाडी, देऊर खुर्द, देऊर बुद्रूक, नकाणे, कुसुंबा, मेहेरगाव, कावठी, बिलाडी, भोकर, निमडाळे, निमखेडे, शिरधाणे प्र. डां, जापी, न्याहळोद, मोहाडी प्र. डां, विश्वनाथ, सुकवड, कौठळ, हेंकळवाडी, तामसवाडी, कापडणे, कुंडाणे (वरखेडे), लोणखेडी, नांद्रे