धुळे : लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून एकाच्या अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळल्याप्रकरणी आरोपी अब्दुल रमजान मन्यार (वय ३०, रा. दोंडाईचा) यास जन्मठेप व दहा हजारांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास सहा महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. हा निकाल जिल्हा व सत्र न्यायाधीश-३ एम.जे.जे. बेग यांनी बुधवारी दिला. दरम्यान या घटनेतील तीन जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
दोंडाईचा येथील आरिफ शेख नईम हा १२ डिसेंबर २०१६ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास पान खाण्यासाठी बाहेर जात होता. त्याचवेळी आरोपी अब्दुल रमजान मन्यार याने लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून आरिफच्या अंगावर रॉकेल टाकून त्यास पेटवून दिले होते. यात तो ६१ टक्के भाजला होता. त्याला धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल केले होेते. तेथे उपचार सुरू असताना १५ डिसेंबर १६ रोजी सकाळी ११.४५ वाजता आरिफ शेख नईम याचा मृत्यू झाला. याप्रकरणी दोंडाईचा पोलिस स्टेशनला अब्दुल रमजान मन्यारसह चौघांवर भादंवि कलम ३०७,३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक संताेष इंगळे यांनी केला. त्यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या घटनेत सरकार पक्षातर्फे १० साक्षीदार तपासण्यास आले. यात आरिफ शेख याचा मृत्यूपूर्व जबाब महत्त्वाचा ठरला. सरकार पक्षातर्फे विशेष अति. सरकारी वकील ॲड. गणेश वाय. पाटील यांनी काम पाहिले. जिल्हा व सत्र न्यायाधीश -३ एम.जे.जे. बेग यांनी आरोपी अब्दुल रमजान मन्यार यास जन्मठेप व तसेच दहा हजारांचा दंड, दंड न भरल्यास सहा महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.