राजेंद्र शर्मा
धुळे : आर्वीकडून धुळेमार्गे सुरतकडे जाणारा ट्रक अवधान फाट्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला. यात ८ लाख २२ हजार ६०० रुपयांची दारू आणि १० लाखांचा ट्रक असा एकूण १८ लाख २२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई गुरुवारी पहाटे करण्यात आली असून दोघांना अटक करण्यात आली. सॅनिटरी पॅडच्या अडोशाला दारू वाहतूक केली जात होती, अशी माहिती पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ट्रकमध्ये (यूपी ८० एफटी ९३९८) दारूसाठा असून हा ट्रक धुळे तालुक्यातील आर्वी येथून धुळ्याच्या दिशेने येत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. त्यानुसार, मुंबई -आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील धुळे तालुक्यातील अवधान फाट्यावर सापळा लावण्यात आला. संशयित ट्रक येताच त्याला अडविण्यात आले. चालकाकडे चौकशी केली असता, ट्रकमध्ये सॅनिटरी पॅड असल्याचे सांगत बिल दाखविले. तरीदेखील पोलिसांना संशय आल्याने ट्रक ताब्यात घेऊन तपासणी केली असता, सॅनिटरी पॅडच्या अडोशाला दारूसाठा लपविलेला असल्याचे आढळून आले. ८ लाख २२ हजार ६०० रुपयांची दारू आणि १० लाखांचा ट्रक असा एकूण १८ लाख २२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी चालक अर्जुन रामजीत बिंद (वय २४, रा. उत्तर प्रदेश) आणि सहचालक सोमनाथ नाना कोळी (वय २६, रा. खामखेडा, ता. शिरपूर) या दोघांना अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलिस अधीक्षक किशोर काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, सहायक पोलिस उपनिरीक्षक संजय पाटील, कर्मचारी संतोष हिरे, पंकज खैरमोडे, महेंद्र सपकाळ, योगेश जगताप, किशोर पाटील यांनी कारवाई केली.