लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : कोरोना विषाणूने लहान मुलांचा आनंदही हिरावला आहे़ दरवर्षी उन्हाळी सुट्यांमध्ये धमाल करणाऱ्या मुलांला यंदाच्या सुट्या घरातच घालवाव्या लागल्या़ त्यामुळे शहरातील उद्याने देखील ओस पडली आहेत़कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात २४ मार्चपासून लॉकडाउन लागू केले़ तत्पूर्वी महाराष्ट्रामध्ये लॉकडाउन झाले होते आणि त्याआधीच शाळा महाविद्यालयांना सुट्या जाहीर करण्यात आल्या होत्या़ परीक्षेच्या आधीच सुट्या लागल्या आणि नंतर परीक्षा देखील रद्द झाल्याने शाळकरी मुलामुलींचा आनंद गगनात मावेनासा झाला होता़आता सुट्या लागल्याने नेहमीप्रमाणे बाहेरगावी फिरायला भेटेल, विविध उद्यानांमध्ये धम्माल करता येईल, मामाच्या गावाला जाता येईल, भरपूर खेळता येईल अशा एक ना अनेक योजना शाळकरी मुलांच्या निरागस मनात उत्हा निर्माण करीत होत्या़ परंतु कोरोनाने लहान मुलांचा सुट्यांचा आनंद, उत्साह हिरावून घेतला़ कधीही घरात न थांबणारी, शाळेतही शांत न बसणारी ही मुले गेल्या दोन महिन्यांपासून घरातच आहेत, एक प्रकारे सेल्फ क्वारंटाईन आहेत़टीव्ही आणि मोबाईल हे दोनच पर्याय त्यांना विरंगुळ्यासाठी शिल्लक आहेत़ काही मुले बुध्दीबळ, कॅरमसह सापसीडी, चंगस असे घरगुती खेळ खेळून वेळ घालवत आहेत तर काही मुले चित्रकला आणि हस्तकेलेसारख्या कलागुणांना वाव देत आहेत़ नृत्य आणि गायनाची आवड असणारी मुले कुटूंबातील प्रौढांसाठी विरंगुळा ठरली आहेत़ असे असले तरी सतत घरात राहून त्याच त्या गोष्टी करुन मुले आता कंटाळली आहेत़ कारण टीव्ही, मोबाईल, सोशल मीडिया आणि कुटूंबातील गप्पांमध्ये कोरोना हाच एकमेव विषय चघळला जात आहे़ घराच्या बाहेर कोरोना आहे हे आता मुलांनाही पुरते कळले आहे़ सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग, निगेटीव्ह, पॉझीटीव्ह, क्वारंटाईन, कंटेनमेंट झोन, बफर झोन, जीवनावश्यक वस्तु हे शब्द मुलांनाही तोंडपाठ झाले आहेत़ कोरोनाच्या सावटात का होईना पण स्वच्छतेचे महत्व त्यांना कळले आहे़
लॉकडाउनमुळे शहरातील उद्याने पडली ओस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 12:31 PM