आॅनलाइन लोकमतधुळे : जिल्हा परिषदेतील समाजकल्याण विभागाच्या दिव्यांग विभागात व्हील चेअर नसल्याच्या कारणावरून दिव्यांगांनी आज या विभागालाच कुलूप लावले. दरम्यान दिव्यांगाच्या आंदोलनाची प्रशासनाने तत्काळ दखल घेत या विभागासाठी व्हीलचेअर दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.जिल्हा परिषदेच्या आवारात समाज कल्याण विभागांतर्गत दिव्यांग विभागाचे कार्यालय आहे. या कार्यालयात विविध कामासाठी दिव्यांग येत असतात.येथील महेश बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा मंदाकिनी गायकवाड या गेल्या काही दिवसांपासून कामानिमित्त समाज कल्याण विभागाच्या दिव्यांग विभागात येत होत्या. मात्र या ठिकाणी व्हीलचेअर नव्हती. याबाबत त्यांनी संबंधित विभगााच्या कर्मचाऱ्यांना विचारले असता, कर्मचारी उडवाउडवीचे उत्तरे देत होते, असे मंदाकिनी गायकवाड यांचे म्हणणे आहे. व्हीलचेअर नसल्याने दिव्यांगाची गैरसोय होत होती. व्हीलचेअर उपलब्ध करून द्यावी यासाठी दोनवेळा आंदोलन करण्यात आली होती. समाज कल्याण विभागाने व्हीलचेअर उपलब्ध करून देण्याचे लेखी आश्वासनही दिले होते. असे असतांनाही दिव्यांगाना व्हीलचेअर उपलब्ध करून देण्यात आली नाही. त्यामुळे ११ आॅक्टोबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास महेश बहुउद्देशीय संस्थेमार्फत संस्थेच्या अध्यक्षा मंदाकिनी गायकवाड, अॅड. अप्पा बोरसे, शीतल चव्हाण, संजय सरग, कविता पाटील आदींनी या कार्यालयाचा ताबा घेतला. कार्यालयात एक कर्मचारी उपस्थित होता. त्याला आतमध्येच कोंडून या सर्वांना बाहेरून दाराला कुलूप लावून घेतले.घडलेल्या प्रकारामुळे खळबळ उडाली. मात्र याठिकाणी व्हीलचेअर उपलब्ध केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
धुळे येथील समाज कल्याण विभागाच्या कार्यालयाला ठोकले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 11:25 AM