देवेंद्र पाठक, धुळे : लोकसभा निवडणुका निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी परवानाधारकांना शस्त्र जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिलेले आहेत. त्यानुसार ४८७ एकूण शस्त्र परवानाधारकांपैकी ३१७ जणांनी आपापल्या हद्दीतील पोलिस ठाण्यात शस्त्र जमा केलेली आहेत.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता १६ मार्च रोजी दुपारी लागताच जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहेत. लवकरात लवकर शस्त्र परवाने पोलिस ठाण्यात जमा करण्याचे आदेश पारीत करण्यात आले होते. याकामी जिल्हा आणि पोलिस प्रशासन झाडून कामाला लागले आहे. जिल्हाधिकारी यांनी बैठकांचे सत्र सुरू केलेले आहे. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे हेदेखील कोठेही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी सूक्ष्म नियोजन आखत आहेत. निवडणूक काळात राजकीय वादविवाद, पूर्व वैमनस्य उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अनुषंगाने जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांची संयुक्त समिती पिस्तूल, रायफल व इतर अग्निशस्त्र जमा करून घेण्याची कार्यवाही पूर्ण करीत आहे. यात केवळ बँका आणि अतिमहत्त्वाच्या सुरक्षा वगळून इतर परवानाधारकांकडील शस्त्र जमा करून घेण्यात येतील, असे आदेश पारीत करण्यात आले होते. कुठल्याही स्थितीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शहरासह ग्रामीण भागात बारकाईने वॉच ठेवण्यात येत आहे.
अवैध शस्त्रांचा शोध सुरू
अवैध शस्त्र बाळगून निवडणुकीच्या काळात मतदारांना धमकी देणाऱ्यांवर पोलिसांकडून कडक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे अवैध शस्त्र शोध मोहीम पोलिसांकडून काही दिवसांपासून हाती घेतली गेली असून, प्रत्येक पोलिस ठाण्यांतर्गत शोध घेण्यात आदेश पारीत झाले आहेत. बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
रेकार्डवरील आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई
जिल्ह्यातील काही गुन्हेगारी वृत्तीचे, रेकॉर्डवर असलेल्या गुंडांवर आता बारकाईने लक्ष दिले जाणार आहे. दारूची तस्करी करणाऱ्यांना पकडले जाणार आहे. साक्री तालुक्यातील सीमा हद्दीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरुवारी कारवाई करून लाखोंचा दारूसाठा जप्त केलेला आहे. दारू माफियांसह मटका, जुगार व इतर अवैध धंदे करणाऱ्यांवर पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानंतर प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुंडांना बोलावून चांगलीच तंबी देण्याची मोहीम राबविण्यात आली आहे. वेळोवेळी त्यांना पोलिसांकडून डोसदेखील दिला जात आहे.