लोकमत न्यूज नेटवर्कनेर : तालुक्यातील नेर येथील वीज कंपनीच्या उपकेंद्रातील लाईनमन संजीव रामभाऊ पिंपळसे (४५) याला विजेचा शॉक लागल्याने त्याचा जागेवरच मृत्यू ओढवल्याची दुर्घटना गुरुवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास घडली़ दरम्यान, या घटनेनंतर विद्युत प्रवाह सुरु करण्यात आलेला नाही़ परिसर अंधारात आहे़ शिवाय पाण्याअभावी पिकाचे नुकसान झाले़सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत धुळे तालुक्यातील नेर येथे ३३ के़ व्ही़ उपकेंद्र हे महाल रायवट भागात आहे़ या उपकेंद्राच्या समोरील भागात पोलीस दूरक्षेत्र आहे़ गुरुवारी पहाटे १ ते २ वाजेच्या सुमारास ज्युनिअर लाईनमन संजू रामभाऊ पिंपळसे हा विजेचे नियंत्रण करीत असताना त्याला विजेचा जोरदार धक्का बसला़ यात त्याचा जागीच मृत्यू झाला़ पहाटेच्या वेळी पोलीस भरतीसाठी उपकेंद्राच्या बाजुला व्यायाम करणारे युवकांना उपकेंद्रातून धूर येत असल्याचे लक्षात आले़ त्यापैकी काहींनी चौकशीसाठी दरवाजा ठोठावला़ परंतु आतून कोणाचाही आवाज आला नाही़ त्यानंतर मागील बाजूस जावून तपासले असता लाईनमनचा मृत्यू झाल्याचे दिसून आले़ घटनेची माहिती वरिष्ठांना कळविण्यात आली़ पोलिसांनाही घटनेची माहिती देण्यात आल्यानंतर घटनेची नोंद करण्यात आल्यानंतर संजू पिंपळसे यांचे शवविच्छेदन झाले़ मयत संजीव पिंपळसे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, भाऊ असा परिवार आहे़
शॉक लागल्याने लाईनमनचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 10:16 PM