धुळे : साक्री तालुक्यातील लोणखेडे येथील ८ वर्षीय बालिका पंढरपूर वारीच्या दिंडीत जात असताना टेंभुर्णीच्यापुढे त्या वारीत असलेल्या बालिकेचा ट्रकच्या मागील चाकाखाली येऊन जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे.बुरझड ता.धुळे येथील सिद्धेश्वर महादेव मंदिराच्या बुरझड पंढरपूर पायी दिंडीत यंदा ९५ पुरुष, २५ महिला व ५ ते ६ लहान मुले होती. दिंडी प्रमुख बुरझडचे वसंत रेवजी पाटील आहेत. लोणखेडे ता.साक्री येथील मनीषा रमेश व्हटगर (वय ८) ही तिची आजी पिताबाई बंडू व्हटगर सोबत वारीत होती. दिंडी अकोला ता़ माढा येथील मुक्कामानंतर दिंडी ७ जुलै रोजी सकाळी ७ वाजता टेंभुर्णीमार्गे बेबळेकडे निघाली़ सकाळी १० वाजता जेवणासाठी बेबळे येथील कदम वस्तीत येथे वारकरी थांबले. सामान वाहण्यासाठी त्यांच्या सोबत ट्रक होता. ट्रकमध्ये मागच्या बाजुला बसलेल्या मनिषा हीने ट्रक थांबताच खाली उडी मारली. त्यानंतर ट्रक चालकाने पाठीमागे न पाहता ट्रक मागे घेतला. क्लीनर बाजूच्या मागच्या चाका खाली येऊन मनीषा दाबली गेली़ परिणामी तिचा जागीच मृत्यू झाला. ट्रक चालक दीपक एकनाथ पाटील (रा़ बुरझड ता़ धुळे) येथील आहे़ त्याच्याविरुद्ध टेंभुर्णी पोलीस ठाण्यात बुरझडचे वसंत रेवजी पाटील यांनी फिर्याद दिली आहे़ ट्रक चालक दीपक पाटील याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे़
लोणखेडेतील बालिकेचा ट्रकखाली आल्याने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2019 5:38 PM