धुळे : एका पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेले ५० हजार रुपये किमतीचे विविध साहित्य चोरट्याने लांबविले. ही घटना शिरपूर तालुक्यातील आमोदे शिवारात १३ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी बुधवारी शिरपूर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. शिरपूर येथील रथ गल्लीत राहणारे अनिल खंडूसिंग राजपूत (वय ५१) यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, शिरपूर तालुक्यातील आमोदे शिवारात प्लॉट नंबर १५ अ आणि ब येथे राजपूत यांचे बांधकाम साहित्य एका पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेले होते. कोणीही नसल्याची संधी साधून चोरट्याने हातसफाई केली.
चोरट्याने ४० हजार रुपये किमतीचे ८ भारी लोखंडी सळई, लोखंडी सळई कापण्याचे ५ हजार रुपये किमतीचे मशीन आणि ३ हजार रुपये किमतीचे गॅस सिलिंडर असा एकूण ५० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्याने लांबविला. चोरीची ही घटना १२ एप्रिल रोजी सायंकाळी ७ ते १३ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान घडली. सर्वत्र शोध घेण्यात आला. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. याप्रकरणी अनिल राजपूत यांच्या फिर्यादीवरून बुधवारी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास फिर्याद दाखल केली. त्यानुसार, चोरट्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस नाईक मनोज पाटील घटनेचा तपास करीत आहेत.