देवेंद्र पाठक, धुळे: सोनगीर गावातील एका शैक्षणिक संस्थेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविण्यात आले. यात साडेचार लाख रुपये रोखीने घेण्यात आले. याशिवाय इतर नातेवाईक व ओळखींच्या लोकांनी विविध पदावर नोकरी मिळावी म्हणून असे एकूण ३३ लाख ५० हजार रुपये जमा करण्यात आले. सतत पाठपुरावा करूनही नोकरी काही मिळाली नाही.
संशयित सुनील ऊर्फ भेरुलाल हिरालाल बागुल (६०, रा. बागुल गल्ली, सोनगीर) याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. शिंदखेडा येथील तुळजा भवानी नगरात राहणारे सत्यनारायण पांडुरंग शिंपी (४८) यांनी सोनगीर पोलिस ठाण्यात शनिवारी फिर्याद दाखल केली. सत्यनारायण शिंपी यांचा इलेक्ट्रिकचा व्यवसाय आहे. भाऊ हनुमंत शिंपी आणि बहीण सुवर्णलता शिंपी यांच्यासह त्यांचे काही नातेवाईक यांनी सोनगीर येथील एका शैक्षणिक संस्थेत नोकरी लावून देण्यासाठी प्रयत्न सुरू होता.
नोकरी लावून देण्याचे आश्वासन देत आमिष दाखविले. त्याबदल्यात नियुक्तीच्या बनावट ऑर्डर तयार करण्यात आली. संस्थेचा स्वत: अध्यक्ष असल्याचे सांगून त्याने विश्वास संपादन केला. त्यानंतर २००९ मध्ये शिंपी यांच्याकडून चार लाख ५० हजार रोखीने घेतले. लिपिक, लॅब असिस्टंट, उपशिक्षक या पदाचे आमिष दाखविण्यात आले होते. नोकरीचे आमिष इतर नातेवाइकांना दाखविण्यात आले. शिंपी यांच्या इतरांकडून एकूण ३३ लाख ५० हजार रुपये घेऊन आर्थिक फसवणूक करण्यात आली. फसवणुकीचा हा प्रकार २००८ ते २०१७ या कालावधीत घडला. नोकरीसंदर्भात वारंवार विचारणा करूनही नाेकरी मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शनिवारी दुपारी ४ वाजता सोनगीर पोलिस ठाण्यात संशयित सुनील ऊर्फ भेरुलाल हिरालाल बागुल (६०, रा. बागुल गल्ली, सोनगीर) याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. पोलिस उपनिरीक्षक रवींद्र महाले घटनेचा तपास करीत आहेत.