मनीष चंद्रात्रे/धुळे - प्रत्येकात काही तरी कलागुण असतात. परंतु, ते सादर करण्यासाठी त्यांना व्यासपीठ मिळत नाही. किंबहुना ते सादर करण्यासाठी अनेक जण धाडसच करत नाही. परिणामी, चांगले कलागुण हे समाजासमोर येत नाहीत. या सर्वंकश विचाराने ‘एकच ध्यास महाकवी कालिदास’ हे ब्रीदवाक्य घेऊन धुळ्यात स्थापन झालेल्या महाकवी कालिदास कवीकट्टा साहित्य मंडळातर्फे नवोदित साहित्यिक व कवींना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
३ एप्रिल २०१६ साली कवी मुरलीधर पांडे यांच्यासह साहित्यिक व कवींनी महाकवी कालिदास कवीकट्टा साहित्य मंडळाची स्थापना केली. सुरुवातीला दर महिन्याच्या दुसºया रविवारी अनुभवी, ज्येष्ठ साहित्यिक व नवोदित साहित्यिक हे श्रीराम कॉलनीतील पांडे यांच्या निवासस्थानी जमत असत. तेव्हा साहित्य व कवितांवर आधारित चर्चा व्हायची. नवोदित साहित्यिक, कवी हे स्वरचित कविता, गझल व ते स्वत: तयार करीत असलेले साहित्य यावर आधारित चर्चा करायचे. पुढे सदस्यांना येणा-या अडचणी विचारात घेता, हा उपक्रम महिन्यातून एका रविवारी शहरातील साहित्यिक, कवी यांच्या घरी घेण्याचे ठरविण्यात आले. आजही हा उपक्रम सुरू आहे.
पुढील आठवड्यात चार कवितासंग्रह होणार प्रकाशितयापूर्वी वर्षभरात एखादे कविता, कथासंग्रह किंवा पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होत होता. मात्र, महाकवी कालिदास कवीकट्टा साहित्य मंडळ स्थापन झाले. तेव्हापासून आतापर्यंत चार कवितासंग्रहाचे प्रकाशन झाले. पुढील आठवड्यातही नवोदित कवी राजेश सोनार यांचा ‘चांदोबाचा दिवा’, सुनील भाईदास बोरसे यांचा ‘मास्तर’, दीपक सूर्यवंशी यांचा ‘सृष्टी’ व राम जाधव यांचा ‘आरसा हे कविता संग्रह प्रकाशित होणार आहेत. राजेश सोनार हे एस. टी. महामंडळात वाहक आहेत. तर दीपक बोरसे मोहाडी येथे जि.प. शाळेत शिक्षक, दीपक सूर्यवंशी हे अभियंता तर राम जाधव हे चित्रकार आहेत.राज्यभरातील २३७ साहित्यिक, कवी मंडळाशी जोडले गेले...-हा उपक्रम सुरू झाल्यानंतर अल्पावधितच पांडे यांनी ‘महाकवी कालिदास कट्टा’ या नावाने व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून या ग्रुपमध्ये राज्यभरातील सर्व जिल्ह्यातील २३७ कवी, साहित्यिक जोडले गेले आहेत. याच ग्रुपमध्ये राज्यातील १५ वरिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य, तर महाविद्यालयांमध्ये मराठी, इंग्रजी, हिंदी विषय शिकविणारे ५० प्राध्यापक तर उर्वरित, कवी व साहित्यक हे या ग्रुपशी जोडले गेले आहेत. या ग्रुपव्यतिरिक्त धुळे शहर व जिल्ह्यातील कवी व साहित्यिकांसाठी ‘धुळे शब्दविद्या’ व ‘वाचनालय’ या नावानेही पांडे यांनी गु्रप तयार केला आहे.
व्हॉट्सअॅप ग्रुपवरच होते नवोदितांना मार्गदर्शन- या तीन ग्रुपशी नवोदित साहित्यिक, कवी मोठ्या संख्येने जोडले गेले आहेत. या नवोदित कवी, साहित्यिकांनी त्यांच्या कविता, गझल किंवा इतर साहित्यिक लेखन या ग्रुपवर पोस्ट केले तर ते या ग्रुपमध्ये असलेले अनुभवी कवी, साहित्यिक त्यांना कविता गझल व साहित्य कसे असले पाहिजे? याविषयी मार्गदर्शन करतात.-त्यामुळे महाकवी कालिदास कवीकट्टा साहित्य मंडळातर्फे महिन्यातील एका रविवारी जरी कवीकट्टा होत असला तरी या ग्रुपवर दररोज नवोदित साहित्यिक, कवींची भेट दररोज होत असते, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. या नवोदितांना ज्येष्ठ साहित्यिक प्र. अ. पुराणिक, सुभाष अहिरे, प्रा. सदाशिव सूर्यवंशी, मंगला रोकडे यांचे मार्गदर्शन लाभत असते.तसेच महिन्यातील एका रविवारी होणारा कवीकट्टा कुठे होणार? याची माहिती या ग्रुपशी जोडलेले सदस्य एकमताने घेतात.