धुळे : महायुती सरकारने माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिन्याला १५०० रुपये चालू केले. महाविकास आघाडीने ही योजना चुकीची ठरविली. त्यातील काहीजण योजना बंद करण्यासाठी न्यायालयात गेले. तुम्ही महिलांना लाच देता आहेत, असे महाविकास आघाडीमधील नेत्यांनी म्हटले. परंतू, तुम्ही चिंता करू नका ही योजना बंद होणार नाही. उलट महायुती सरकार सत्तेत येताच तुम्हाला महिन्याला २१०० रुपये मिळतील, ते पैसे तुमच्या खात्यात जमा होतील. जे सावत्र भाऊ असतात, त्यांना आपल्या बहिणींचे चांगले झालेले सहन होत नाही, असा आरोप महिला भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सोमवारी नकाणे रोडवरील राधेकृष्ण भवनात आयोजित महिला मेळाव्यात बोलताना केला.
मेळाव्याला धुळे शहर विधानसभेचे भाजप महायुतीचे उमदेवार अनुप अग्रवाल, उत्तर महाराष्ट्र प्रमुख जयश्री अहिरराव, धुळे शहर प्रभारी आमदार मुकेश पटेल, जिल्हाध्यक्ष वैशाली शिरसाठ, माया परदेशी, माजी खासदार डॉ. सुभाष भामरे, प्रतिभा चौधरी, प्रतिभा शिंदे, वैभवी दुसाणे, अरुण पवार, आरती पवार, उर्मिला पाटील, जयेश वावधे, वंदना थोरात, प्रभादेवी परदेशी, मंगला पाटील, प्रिया कपोले, मोहिनी धात्रक, रंजना पाटील, नेहा अहिरराव यांच्यासह मोठ्या संख्येन महिला उपस्थित होत्या. आपल्या बहिणींवर, मुलींवर अन्याय झाला, तर त्यांच्या न्यायासाठी लढणारा आपला हक्काचा भाऊ पाहीजे असेल तर अनुप अग्रवाल यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे रहा, असे आवाहन चित्रा वाघ यांनी महिलांना केले.