शिरपूर तालुका हा सन १९५२ पासून पहिल्या विधानसभा निवडणुकीपासून काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहिला आहे. दोन अपवाद वगळता तब्बल ७२ वर्षे या पक्षाचे वर्चस्व होते. मात्र काँग्रेसचे आमदार असलेले अमरिशभाई पटेल यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर २०१९ पासून संपूर्ण तालुका भाजपाकडे गेला. आता परिस्थिती अशी आहे की काँग्रेससह आघाडीला याठिकाणी उमेदवार मिळत नसल्याने यंदाही जागा भाकपला सोडण्यात आली. त्यामुळे शिरपूर विधानसभा मतदारसंघाच्या विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच काँग्रेसचे चिन्ह दिसणार नाही.
२०२४ च्या निवडणूकीत तीन पक्षाचे सरकार असल्यामुळे महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदार संघात या पक्षाच्या उमेदवाराला संधी मिळेल अशी आशा असतांना राष्ट्रवादी पक्षाला देखील दूर ठेवून पक्षाचा वंचित घटक पक्ष असलेला भाकपला ही जागा देण्यात आली त्यामुळे भाकप विरोधात भाजपाचा सामना रंगणार आहे.
या मतदार संघात भाजपा विरोधात भाकप, बसपा व ३ अपक्ष असे ६ जणांमध्ये लढत होणार आहे. ७२ वर्षाच्या इतिहासात प्रथमच काँग्रेस पक्षाचे पंजाचे चिन्ह या मतदान यंत्रावर दिसणार नाही. तालुक्यात आदिवासी बहुल परिसर मोठा आहे. आदिवासी मतदार यंदाच्या निवडणूकीत पंजाऐवजी कुणाला मतदान करतात हे मतमोजणीच्या दिवशी स्पष्ट होईल. परंतू हे मात्र निश्चित की शिरपूर तालुक्यात प्रथमच काँग्रेसचे चिन्ह दिसणार नाही.
तब्बल ६० वर्ष काँग्रेस आमदार निवडून आले
शिरपूर विधानसभा मतदारसंघाच्या ७२ वर्षाच्या इतिहासात ५ वर्षे भाजपा, साडेसात वर्षे जनता पक्ष वगळता उर्वरीत ६० वर्षे काँग्रेस पक्षाचे आमदार निवडून आले आहेत. सन १९५२ मध्ये पहिली निवडणूक झाली त्यात पहिला आमदार म्हणून काँग्रेस पक्षाचे ग. द. माळी निवडून आले होते. त्यानंतर १९५७ व १९६२ या सलग २ पंचवार्षिक निवडणूकीत काँग्रेस पक्षाचे कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर, १९६७ व १९७१ या २ पंचवार्षिक निवडणूकीत सुध्दा काँग्रेस पक्षाचे शिवाजीराव गिरधर पाटील हे विजयी झाले होते. त्यानंतर मध्यवर्ती निवडणकीत सन १९७८ मध्ये अडीच वर्षाकरीता जनता पक्षाचे प्रल्हादराव माधवराव पाटील हे विजयी झाले होते. सन १९८० मध्ये इंद्रसिंग चंद्रेसिंग राजपूत हे काँग्रेस पक्षाकडून विजयी झाले होते. सन १९८५ मध्ये जनता पक्षाचे संभाजी हिरामण पाटील हे निवडून आलेत. १९९० मध्ये अमरिशभाई पटेल मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. तेव्हापासून त्यांनी तालुक्यावर वर्चस्व राखले. सन १९९५, १९९९ व सन २००४ असे ४ वेळा ते काँग्रेस पक्षाचे आमदार झाले. सन २००९ व २०१४ मध्ये काँग्रेस पक्षाकडून काशिराम पावरा विजयी झाले. त्यानंतर आमदारद्वयींनी भाजपात प्रवेश केला. काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या शिरपूर मतदारसंघात अचानक कमळ फुलले. सन २०१९ मध्ये भाजपाच्या चिन्हावर काशिराम पावरा तिसऱ्यांदा विजयी झाले. प्रथमच ते भाजपाचे आमदार झाले आहेत.